महाविकास आघाडीतील बंडखोरीमागे भाजपचा हात

भाजपच्या बटेंगे तो कटेंगे ही भूमिका उलटी आहे. जाती, धर्माच्या नावावर मतांचे विभाजन भाजपकडून केले जाते. फोडाफोडी केल्यानंतर मग कटेंगेची भूमिका भाजप पार पाडते, अशी टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच राज्यातील महाविकास आघाडीतील बंडखोर उमेदवारांमागे भाजपचा हात असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

पुण्यातील काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पुण्यात दाखल झालेले थोरात यांनी पत्रकार परिषदेत महायुती सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात अदृश्य शक्तीचा वापर करीत भाजपने शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. त्यांचे हे फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्रातील जनतेला आवडले नाही. महाविकास आघाडीत सत्तेवर असलेल्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांच्यावर ईडीसारख्या चौकशा लावल्या. फोडाफोडीचे राजकारण करीत भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्यांनाच ते सत्तेत घेऊन बसले आहेत. त्यांच्या चौकशीच्या फाईलीवर कारवाई होत नाही. पक्षातंर बंदीचा कायदा भाजपने मोडीत काढला आहे.

तर सहा महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

राज्यात महाविकास आघाडीच्या 180 पेक्षा अधिक जागा आणण्याचा प्रयत्न आहे. आघाडीची सत्ता राज्यात येणार आहे. सरकारची आर्थिक घडी व्यवस्थित करून आम्ही जाहीरनाम्यातील योजना राबवू. महायुतीने रखडविलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महिन्यांत घेतल्या जातील, असेही थोरात म्हणाले.

महायुतीने आर्थिक शिस्त बिघडवली

गेल्या अडीच वर्षात महायुतीच्या राज्य सरकारने राज्यात असलेली आर्थिक शिस्त मोडीत काढण्याचे काम केले आहे. आमदारांना दिल्या जाणाऱ्या निधी वाटपात दुजाभाव केला आहे. यापूर्वी निधीचे समान वाटप केले जात होते. अनेक चुकीचे निर्णय घेऊन आर्थिक शिस्त बिघडविली आहे. ‘लाडकी बहीण’, ‘शासन आपल्या दारी’ या योजना राबविल्या जात आहेत; पण प्रत्यक्षात या योजनांपेक्षा जाहिरातींवर जास्त पैसा खर्च केला जात असल्याची टीकाही बाळासाहेब थोरात यांनी केली