बालविवाहाविरुद्ध मुलींनीच थोपटले दंड; 13 गावांतील 550 मुली बनल्या फुटबॉलपटू

राजस्थानच्या अजमेर, केकरी विभागातील 13 गावांमध्ये मुलींनीच बालविवाहाविरुद्ध दंड थोपटले असून तब्बल 550 मुली फुटबॉलपटू बनल्याचे चित्र आहे. या मुलींनी साखरपुडा मोडून वेगळाच आदर्श जगासमोर ठेवला. 245 मुली बालविवाहाविरुद्ध लढा देत आहेत. सहा मुली प्रशिक्षक झाल्या, तर 15 मुलींनी राष्ट्रीय स्पर्धा गाजवली. महिला जन अधिकार समितीच्या संचालिका इंदिरा पंचौली आणि समन्वयक पद्मा यांच्या माध्यमातून हा क्रांतिकारी बदल घडला आहे. पंचौली बंगालमध्ये गेले होते तेव्हा गावातील मुली शाळा सुटल्यानंतर फुटबॉल खेळत असल्याचे त्यांना दिसले. त्या त्यांच्या दप्तरातच कपडे आणत असत. त्यानंतर पंचौली यांनी अजमेर जिल्ह्यात बदल घडवून आणण्याचा जणू विडाच उचलला.

फुटबॉल हा मुलांचा खेळ

फुटबॉल हा मुलांचा खेळ असून त्यांचे हातपाय मोडले तर कुणाशी लग्न करणार. मुली गावाबाहेर गेल्यास लोक चुकीचा अर्थ काढतील अशी कारणे पालकांनी देण्यास सुरुवात केली. परंतु मुली स्वत:साठी उभ्या राहू लागल्या. हे प्रकरण पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचले. अखेर मुलीच जिंकल्या आणि मोकळेपणाने फुटबॉल खेळू लागल्या. राज्य स्पर्धेत जे दोन संघ अंतिम सामने खेळले ते दोन्ही संघ महिला जन अधिकार समितीने तयार केले. आता या गावांमध्ये महिला जन अधिकार समितीचे प्रशिक्षक रोज संध्याकाळी सराव करतात.