
शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांकरिता 25 टक्के आरक्षित जागांवरील प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्यात येणार आहे. सुधारित नियम तयार करण्याकरिता समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीसमोर पालकांना आपल्या सूचना मांडता येतील. 25 एप्रिलपर्यंत या सूचना स्वीकारण्यात येणार आहेत. 25 टक्के आरक्षित जागांवरील प्रवेश प्रक्रियेत सध्या अनेक त्रुटी आहेत.
अनेकदा बोगस व अपात्र विद्यार्थी यातून प्रवेश घेतात. कधी कधी प्रशासकीय स्तरावरील गोंधळामुळे प्रवेश प्रकिया बराच काळ लांबते. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्याची मागणी पालकांबरोबरच संस्थाचालकांकडून होत आहे. प्रवेश प्रक्रियेत अधिक सुलभता यावी, याकरिता पालकांकडून सूचना मागविल्या जात आहेत. आरटीई पोर्टलवर ‘पालकांचे अभिप्राय’ याअंतर्गत अभिप्राय देण्यात यावेत, अशा सूचना शिक्षण विभागातर्फे करण्यात आल्या आहेत.
ही काळजी घ्या
- सूचना 100 शब्दांत मांडाव्यात.
- त्या मोघम असू नयेत.
- कोणत्याही संस्था, व्यक्ती, शाळेवर टीका टिप्पणी असू नये.
- विषयाशी संबंधित असाव्यात.