आई मुलाला बलात्कार करायला कधीच मदत करणार नाही, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा; गुन्हा केला रद्द

बलात्कार करण्यासाठी आई मुलाला कधीच मदत करणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत उच्च न्यायालयाने एका आईविरोधातील गुन्हा रद्द केला. आरोपीच्या आईने मला ज्यूसमधून मादक द्रव्य दिले. त्यानंतर मला चक्कर आली. याचा फायदा घेत आरोपीने बलात्कार केला, असा पीडितेचा दावा होता. न्या. विभा कंकणवाडी व न्या. आर. डब्ल्यू. जोशी यांच्या खंडपीठाने हा दावा मान्य केला नाही. पीडितेने आरोपीच्या आईवर केलेले आरोप विश्वासार्ह नाहीत. कोणतीही आई असे कृत्य करणार नाही, असे औरंगाबाद खंडपीठाने नमूद केले.

पीडिता बलात्काऱ्याच्या मुलाला जन्म देणार नाही

या प्रकरणातील पीडितेला बाळ झाले आहे. पीडितेने बाळाच्या वडिलांवर बलात्काराचा आरोप केला आहे. कोणतीही पीडिता बलात्काऱ्याच्या मुलाला जन्म देणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

आरोपींचा युक्तिवाद

पीडितेच्या संमतीनेच शारीरिक संबंध ठेवले होते. पीडितेचा बलात्काराचा आरोप आधारहीन आहे. माझ्या आईविरोधातही विनाकारण गुन्हा नोंदवण्यात आला. पीडितेचा आधी विवाह झाला होता. तिला मुलगा आहे. हे दोघेही माझ्या कुटुंबासोबत असताना आनंदी असायचे, असा युक्तिवाद आरोपीने केला. पीडितेसोबतचे फोटोही आरोपीने न्यायालयात सादर केले.

पोलिसांचा दावा

पीडितेवरील बलात्काराचे आरोपपत्र दाखल झाले आहे. पीडिता आरोपीच्या संपर्कात कशी आली, कसा त्याने पीडितेचा विश्वास संपादित केला, कसा तिचा गैरफायदा घेतला हे सर्व पीडितेने सांगितले आहे. पीडितेच्या संमतीनेच शरीरसंबंध ठेवण्यात आले, असा तर्क आताच काढणे योग्य नाही. त्यासाठी याचा खटला पूर्ण होणे आवश्यक आहे, असा दावा पोलिसांनी केला. तो न्यायालयाने मान्य केला नाही.