लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार झाल्याचा दावा विवाहित महिला करू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने एका आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला. विशाल शिंदे असे या आरोपीचे नाव आहे. एका महिलेने त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. अटकपूर्व जामिनासाठी शिंदेने याचिका केली होती. न्या. मनीष पितळे यांच्या एकल पीठासमोर सुनावणी झाली.
पीडिता विवाहित आहे. शिंदेचादेखील विवाह झाला आहे. दोघेही दुसरा विवाह करू शकत नाही, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला ही बाब मान्य केली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
शिंदे तपासात सहकार्य करत नाही. परिणामी त्याला जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद पोलिसांनी केला होता. हा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला नाही. शिंदेने पोलिसांना सहकार्य करावे. पुराव्यांशी छेडछाड करू नये, अशा अटींवर न्यायालयाने शिंदेला 25 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.
पुणे येथील शिंदेसोबत माझी मैत्री होती. त्याने मला लग्न करण्याचे आश्वासन दिले. माझ्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. नंतर माझे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली, अशी तक्रार पीडितेने पोलिसांत केली. त्याची दखल घेत पोलिसांनी शिंदे विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला.