शंभू बॉर्डर आठवडय़ात उघडण्याचे आदेश
पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने बुधवारी हरयाणा सरकारला एका आठवडय़ाच्या आत शंभू बॉर्डर उघडण्याचे आदेश दिले. सर्वसामान्य जनतेला असुविधा होत असल्याने उच्च न्यायालयाने हे आदेश दिले. राष्ट्रीय मार्गावरून तत्काळ बॅरिकेड्स हटवण्यात यावेत, असेही न्यायालयाने म्हटले. शेतकऱयांनी 13 फेब्रुवारीला हरयाणा आणि पंजाब सीमेवरील शंभू बॉर्डरवर आंदोलन केले. हे आंदोलन रोखण्यासाठी सरकारने ही सीमारेषा बंद केली होती. अंबाला जिह्यातील सीमेवर शंभू गाव आहे. सर्वसामान्य लोकांना याचा त्रास होत असल्याने ही सीमारेषा उघडण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले.
कर्मचारी कपातीनंतर पेटीएमला समन्स
कर्मचाऱयांना जबरदस्तीने कामावरून काढून टाकल्याप्रकरणी डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमला कामगार आयुक्तांनी नोटीस पाठवली. बंगळुरूच्या प्रादेशिक कामगार आयुक्तांनी पेटीएमची पॅरेंट कंपनी वन 97 कम्युनिकेशनला ही नोटीस बजावली आहे. कामावरून काढून टाकल्यानंतर काही कर्मचाऱयांनी पंपनीविरोधात तक्रार दाखल केली होती.
घसरगुंडीनंतर शेअर बाजार सावरला
बुधवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. परंतु नंतर बाजार सावरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 426 अंकांच्या घसरणीसह 79 हजार 924 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 108 अंकांच्या घसरणीसह 24 हजार 324 अंकांवर बंद झाला.
ड्रायव्हरलेस कारने उडवले
चीनमध्ये ड्रायव्हरलेस कारने रस्त्याने चाललेल्या एका पादचाऱयाला धडक दिली. कारने धडक दिल्यानंतरही सोशल मीडियावर अनेक जण कारची बाजू घेताना दिसत आहेत. कारण गाडय़ांसाठी ग्रीन सिग्नल मिळूनही हा पादचारी रस्ता ओलांडत होता. या धडकेत पादचारी किरकोळ जखमी झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.