जगभरातून महत्वाच्या बातम्या

14 जुलैपर्यंत अंबानींच्या घरी लग्नाची धामधूम

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळय़ाची धामधूम 14 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. 8 जुलैला गृह पूजा, 10 जुलैला शिव पूजा, 10 जुलैला रात्री यंगस्टर्स पार्टी, 12 जुलैला विवाह, 13 जुलैला आशीर्वाद समारंभ, तर 14 जुलैला रिसेप्शन होणार आहे.

गाझावर पुन्हा इस्रायलचा हल्ला

इस्रायलने गाझावर पुन्हा एकदा हल्ला केला. या हल्ल्यात 87 लोकांचा मृत्यू झाला. गेल्या 48 तासांत वेगवेगळ्या ठिकाणी हे हल्ले करण्यात आले. गेल्या 7 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या हल्ल्यात आतापर्यंत कमीत कमी 38,098 फिलिस्तीनी लोक मारले गेले आहेत. तर 87, 705 लोक जखमी झाले आहेत.

आसामामध्ये जनजीवन विस्कळीत

आसाममध्ये सध्या अनेक ठिकाणी पूरस्थिती गंभीर आहे. राज्यातील 22 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुरामुळे गेल्या आठ दिवसांपासून विजेचा पत्ता नाही. आसाममध्ये या वर्षी पुराने कहर केला आहे. 29 जिल्हे पूरग्रस्त आहेत.

मेंदू खाणाऱया अमिबाची केरळात चौथी लागण

केरळमध्ये अमिबा मानवी मेंदू खात असल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षांच्या मुलाला मेंदूतील दुर्मिळ संसर्ग, अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस झाल्याचे निदान झाले आहे. या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मेंदूच्या संसर्गाने ग्रस्त मुलगा उत्तर केरळ जिह्यातील पयोली येथील रहिवासी आहे. केरळमध्ये मेंदू खाणाऱया अमिबाची चार प्रकरणे आढळून आली आहेत. सर्व रुग्ण मुले आहेत.

हिजाब विरोधी मसूद इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष

मसूद पजश्कियान हे इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. त्यांनी कट्टरतावादी नेते सईद जलिली यांचा 30 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. मसूद हे हिजाब विरोधी म्हणून ओळखले जातात. पजश्कियान यांना 16.4 दशलक्ष मते मिळाली, तर जलिली यांना 13.6 दशलक्ष मते मिळाली. 19 मे रोजी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. यानंतर देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका जाहीर झाल्या.