जगभरातून महत्त्वाच्या बातम्या

गुगल मॅप सर्व्हीस आजपासून स्वस्त

गुगल मॅपची सर्व्हीस 1 ऑगस्टपासून स्वस्त मिळणार आहे. गुगल मॅपची प्रोफेशनल सेवेवर उद्यापासून 70 टक्के कमी फी द्यावी लागणार आहे. तसेच ही फी डॉलर ऐवजी हिंदुस्थानी रुपयात पे करावी लागणार आहे. याचा लाभ वेबसाईट्स, अॅप्स आणि पंपन्यांना मिलेल. गुगल मॅपची सर्व्हीस सर्वसामान्यांसाठी फ्री आहे. परंतु, जे यूजर्स ही सेवा प्रोफेशनली घेतात त्यांच्यासाठी स्वस्त करण्यात आली आहे. प्रवासासाठी हमखास वापरले जाणारे अॅप म्हणजे गुगल मॅप होय. 1 ऑगस्टपासून गुगल मॅपच्या पेमेंट सिस्टमध्ये बदल दिसतील.

यूपीएससीच्या अध्यक्षपदी प्रीती सूदन

प्रीती सूदन यांची केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. प्रीती या 1983 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. उद्या, 1 ऑगस्ट रोजी त्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील. प्रीत सूदन यांनी याआधी केंद्रीय आरोग्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ आणि ‘आयुष्मान भारत मिशन’मधील योगदानासाठी त्या ओळखल्या जातात. तंबाखूवरील फ्रेमवर्प कन्व्हेन्शनसाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या स्वतंत्र पॅनेलचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

हरिद्वारमध्ये बम बम भोले!

हरिद्वारमध्ये चारही बाजूंनी शिव भक्तांची मांदियाळी दिसत असून बम बम भोलेचा जयघोष ऐकायला मिळत आहे. कावड यात्रेचा अक्षरशः महापूर आला आहे. आतापर्यंत अडीच लाख कावड यात्रेकरूंनी जल भरून आपापल्या दिशेने प्रस्थान केले आहे. दोन ऑगस्टला शिवरात्री आहे. या दिवशी हरिद्वारमधून आणलेल्या पाण्याचा जलाभिषेक करायचा आहे. त्यामुळे कावड यात्री परतीच्या मार्गाला लागले आहेत.

मसाला डोसा लोकांचा फेव्हरेट

ऑनलाईन फूड मागवणाऱया ग्राहकांची पहिली पसंती बिर्याणी नव्हे तर मसाला डोसा आहे, असा खुलासा फूड डिलिव्हरी पंपनी स्विगीने नुकताच केला आहे. मुंबईत दाल खिचडी, पाव भाजी आणि मार्गेरिटा पिझ्झाला सर्वाधिक पंसती आहे. देशभरात 90 टक्के ग्राहकांची ऑर्डर ही व्हेज असून यात सर्वात जास्त मसाला डोसा मागवला जातो. मसाला डोसा नंतर वडा इडली, पोंगल सर्वात जास्त फेव्हरेट आहे. काही ग्राहक पनीर बटर मसाला, प्लेन डोसाही ऑर्डर करत आहेत.

जे बोलायचं ते समोर येऊन बोला

अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष कोण? याचा फैसला येत्या 5 नोव्हेंबरला होणार आहे. रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प, तर डेमोक्रॅटिक पक्षाकडून कमला हॅरिस मैदानात उतरल्या आहेत. हे दोन्ही नेते तगडे असल्याने एकमेकांवर बेछूट आरोप करत आहेत. कमला हॅरिस यांनी जोरदार प्रचार सुरू केला असून डोनाल्ड ट्रम्प यांना थेट आव्हान दिले आहे. तुम्हाला जे काही बोलायचे असेल ते तुम्ही समोर येऊन बोला, असे हॅरिस म्हणाल्या. हॅरिस यांनी जॉर्जियातील अटलांटा शहरात एका निवडणूक रॅलीला संबोधित केले. या वेळी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलेच खडेबोल सुनावले. या निवडणुकीत हवा बदलली आहे. माझ्यासोबत डिबेट करण्यासाठी ट्रम्प पुन्हा एकदा विचार करतील. जर तुम्हाला काही बोलायचे असेल तर थेट तोंडावर बोला. परंतु त्यांचे साथीदार (जेडी वैंस) यांना माझ्याविषयी बरेच काही बोलायचे आहे, असा टोलाही हॅरिस यांनी लगावला.

हमासच्या म्होरक्याची हत्या

इस्रायलवर 7 ऑक्टोबर 2023 ला हल्ला करणाऱया हमासचा म्होरक्या इस्माईल हानिया यांची इराणची राजधानी तेहरानमध्ये हत्या करण्यात आली. हानिया हे 30 जुलैला इराणचे नवे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी तेहरानला गेले होते. या वेळी त्यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांचीही भेट घेतली. इस्रायलने ‘हानिया यांच्या ठिकाणाला लक्ष्य केले. त्यात हमासच्या प्रमुखांसह त्यांचा अंगरक्षकही मारला गेला.’

इस्रायलचा लेबनॉनवर हल्ला

इस्रायलने लेबनॉनची राजधानी बेरूतवर हल्ला केला. या हल्ल्यात दहशतवादी हिजबुल्लाचा कमांडर हज मोहसीन ऊर्फ फुआद शुक्र याच्यासह 3 जणांचा मृत्यू झाला असून 74 जण जखमी झाले आहेत. हिजबुल्लाह किंवा लेबनॉनने मात्र अद्याप फुआदच्या मृत्यूची पुष्टी केलेली नाही. गोलान हाइट्सच्या फुटबॉल मैदानावर लेबनॉनमधून रॉकेट डागले होते. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 30 जण जखमी झाले होते.