जगभरातून महत्वाच्या बातम्या

रेल्वे कर्मचाऱयाला पाठवले 4  कोटीचे वीज बिल

नोएडामधील एका रेल्वे कर्मचाऱयाला तब्बल 4 कोटी 2 लाख रुपयांचे वीज बिल पाठवण्यात आले. मोबाईलवर आलेला मेसेज पाहून घरमालकाला प्रचंड धक्का बसला. वीज बिल येताच या व्यक्तीने वीज विभागाकडे यासंबंधीची तक्रार दाखल केली. वीज कंपनीकडून एसएमएस अलर्ट मिळाला. यात 9 एप्रिल ते 18 जुलैपर्यंतचे वीज बिल होते.

इंडिगोचे अवघ्या काही तासांत 5300 कोटी बुडाले

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये झालेल्या चुकीचा फटका केवळ अमेरिकेला बसला नाही तर जगभरात पाहायला मिळाला. एअरलाईन कंपनी इंडिगोला याचा जबरदस्त फटका बसला असून कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यामुळे तब्बल 5300 कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. इंडिगोच्या विमान प्रवाशांना विपेंडवरही त्रास सहन करावा लागू शकतो, असे इंडिगोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. एअरपोर्टकडे निघण्याआधी एकदा स्टेट्स चेक करून निघा, असा सल्ला इंडिगोने आपल्या विमान प्रवाशांना दिला आहे.

टीसी प्रलंबित शुल्काची नोंद क़रू नका!

शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देताना ट्रान्स्फर सर्टिफिकेट (टीसी) सादर करण्याचा दवाब टाकू नये. तसेच विद्यार्थ्यांचे शुल्क प्रलंबित असेल तर तशी नोंद टीसीमध्ये करू नये, असे आदेश तामिळनाडू सरकारने राज्यातील सर्व शाळांना द्यावेत, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला. या आदेशाचे उल्लंघन होत असेल तर  कारवाई करा असे निर्देश ही न्यायालायाने दिले.

तेल अवीववर हुतीचा ड्रोन हल्ला, एक जण ठार

हिजबुल्लाह यांच्यानंतर आता हुतीने इस्रायलवर ड्रोनने हल्ला केला. या हल्ल्यात एक जण ठार झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. हा हल्ला अमेरिकन दुतावासाजवळ करण्यात आला. अमेरिकी दुतावासाला कोणतेही नुकसान झाले नाही. या हल्ल्यानंतर इस्रायलच्या सुरक्षा एजन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या हल्ल्यामुळे आजूबाजूच्या इमारतीच्या काचा फुटल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या हल्ल्यानंतर तेल अवीव नागरिकांमध्ये घबराट पसरली.

चीनमध्ये पावसाचा कहर; पूल कोसळून 11 जणांचा मृत्यू

चीनमध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे. शुक्रवारी रात्री पूल कोसळून 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना चीनमधील शानक्सी प्रांतात घडली. सध्या बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. चीनमध्ये मंगळवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

रशियात अमेरिकन पत्रकाराला  16 वर्षांचा तुरुंगवास

रशियाच्या तुरुंगात 479 दिवस पैद असलेले अमेरिकन पत्रकार इव्हान गेर्शकोविच यांना 16 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रशियाच्या न्यायालयाने इव्हानला हेरगिरी प्रकरणात दोषी ठरवले आहे. इव्हान हा अमेरिकन गुप्तचर एजन्सी सीआयएचा एजंट आह़े

जिओला तीन महिन्यांत 5445 कोटींचा नफा

रिलायन्स जिओ लिमिटेडला आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत 5 हजार 445 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 13 टक्क्यांनी वाढून 4,716 कोटी रुपये झाला आहे.

हिंदुस्थानात नेटफ्लिक्स पाहणाऱ्यांची संख्या वाढली

ऑनलाईन स्ट्रिमिंग कंपनी नेटफ्लिक्ससाठी हिंदुस्थानात मोठे बाजारपेठ बनले आहे. हिंदुस्थानात जून महिन्यात नेटफ्लिक्स पाहणायांची संख्या 80 लाखांनी वाढली आहे. या महिन्यात 80 लाखांहून जास्त नवीन सब्सक्राईबर्स जोडले गेले आहेत.