
शेअर बाजाराचा नवा उच्चांक
शेअर बाजारात गुरुवारी नवा उच्चांक पाहायला मिळाला. सेन्सेक्स आणि निफ्टी नव्या रेकाॅर्डवर पोहोचून बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 627 अंकांनी वधारून 81,343 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 188 अंक वधारून 24,801 अंकांवर बंद झाला. शेअर बाजार 18 जुलैला लागोपाठ चौथ्या सत्रात वाढीसोबत बंद झाला. निफ्टीतील टीसीएस, एलटीआयमाइंडट्री, ओएनजीसी, बजाज, फिनसर्व आणि एसबीआय लाईफ इन्शूरन्स टॉप फायदेशीर राहिले, तर एशियन पेंट्स, हिरो मोटोकाॅर्प, ग्रासिम, कोल इंडिया आणि बजाज ऑटोच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.
पाकिस्तानात गव्हाचे पीठ 800 रुपये किलो
महागाईमुळे आधीच जगणे मुश्किल झालेल्या पाकिस्तानातील सामान्य जनतेचे हाल दिवसेंदिवस वाईट बनत आहेत. महागाईने पाकिस्तानातील जनतेच्या खिशात हात घातला असून दैनंदिन वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. गव्हाच्या पिठाचे भाव 800 पाकिस्तानी रुपये किलो तर तेल 900 रुपये किलो दराने विकले जात आहे. एका चपातीसाठी गरीबांना 25 रुपये मोजावे लागत आहे. पाकिस्तानी रुपयाचे मूल्यही घसरले असून रोजच्या जेवणाबरोबर घर, आरोग्य आणि शिक्षणदेखील आवाक्याबाहेर गेले आहे.
अभिनेत्री रिचा चड्ढाला कन्यारत्न
अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फझल यांना कन्यारत्न झाले आहे. रिचा आणि अलीने सोशल मीडियावर पोस्ट लिहून ही माहिती दिली. ‘16 जुलै रोजी आमच्या घरी मुलीचा जन्म झाला. त्याचा आनंद मोजता येणार नाही. आमच्या पुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. आम्ही तुम्हा सर्वांचे आभारी आहोत,’ अशा भावना दोघांनी व्यक्त केल्या. 14 जुलै रोजी रिचाने एक पोस्ट शेअर करत लिहिलं होतं की, ‘सध्या आराम नाही. खूप काही सहन करत आहे. मला सध्या खूप वेगळं वाटत आहे, असे रिचा म्हणाली.
जो बायडेन यांना कोरोनाची लागण
अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांना कोरोनाची लागण झाली आहे. लास वेगासमधील कार्यक्रमानंतर बायडेन यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. बायडेन यांच्यावर सध्या उपचार सुरू असून डेलावेयर शहरात त्यांनी स्वतःला आयसोलेट केले आहे. व्हाइट हाउसने दिलेल्या माहितीनुसार या परिस्थितीतही बायडेन आपल्या कर्तव्याचे पालन करणार असून त्यांच्या तब्येतीवर व्हाइट हाऊस वेळोवेळी माहिती देणार आहे. बायडेन यांना कोरोनाची सामान्य लक्षणे असल्याने त्यानी पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
जान्हवी कपूर रुग्णालयात दाखल
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अन्नाची विषबाधा झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जान्हवीला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तिने सर्व कार्यक्रम रद्द केले. बुधवारी तिला रुग्णालयात दाखल केले असून गुरुवारी तिच्या प्रपृतीत सुधारणा झाल्याचे सांगण्यात येत आहे. जान्हवी कपूर रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी गुरुवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झाली.