पंतप्रधान जन आरोग्य योजनेचे मोठे रॅकेट उघडकीस, पैशासाठी अँजिओप्लास्टी
गुजरातमध्ये पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी गरज नसताना रुग्णांवर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यामुळे नाहक दोन दोन जणांना जीव गमवावा लागला. यामध्ये एका 18 वर्षांच्या युवकाचा समावेश आहे. मृत दोघांनाही अँजिओप्लास्टीची गरज नव्हती, परंतु तरीही ऑपरेशन करण्यात आल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला.
रेल्वेची बंपर कमाई
या वर्षी रेल्वेने 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबरदरम्यान म्हणजे सणासुदीच्या काळात तिकीट विक्रीतून 12 हजार 159 कोटींहून अधिकची कमाई केली. दोन महिन्यांच्या कालावधीत गणेश चतुर्थी, दसरा आणि दिवाळीसारखे सण आले होते. त्यामुळे ट्रेनने प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या वाढली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत ही माहिती दिली.
सोन्याला झळाळी, चांदीही चमकली
सोने पुन्हा एकदा 451 रुपयांनी महाग झाले आहे. सराफा बाजारात 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम साडे चारशेने वाढून 76,287 रुपयांवर पोहोचले आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावातसुद्धा वाढ झाली आहे. शुक्रवारी चांदी 1346 रुपयांनी वाढून प्रतिकिलो 89,250 रुपयांवर पोहोचली. सोन्याच्या किमतीत वर्षभरात 13 हजार 386 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याच्या भावात अशीच वाढ होत गेली तर पुढील वर्षी 30 जूनपर्यंत सोने 85 हजार प्रतितोळापर्यंत जाईल, असे बोलले जात आहे.
कर्ज घेणाऱयांची संख्या वाढली
देशभरात कर्ज घेणाऱयांच्या संख्येत वाढ झाली आहे. घरातील गरजा पूर्ण करण्यासाठी लोक कर्ज घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत. अनेक जण ईएमआयवर वस्तू खरेदी करत आहेत. यात विशेष म्हणजे ग्रामीण भागातील लोकांची संख्या शहरी भागातील लोकांच्या तुलनेत जास्त आहे. देशात प्रति एक लाख लोकांमागे 18,322 जण कर्ज घेऊन कर्जबाजारी झाले आहेत. शहरी भागात 17.44 टक्के तर ग्रामीण भागात 18.7 टक्के लोक कर्जबाजारी आहेत. ग्रामीण भागात खरेदी सहा टक्क्यांनी वाढली आहे, तर शहरी भागात हे प्रमाण 2.8 टक्के इतके आहे.
गुन्हे रोखण्यासाठी 6.69 लाख सीमकार्ड बंद
देशात सायबर क्राइम वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कडक पाऊल उचलले आहे. 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत देशात 6.69 लाखांहून अधिक बनावट सीमकार्ड आणि 1.32 लाख आंतरराष्ट्रीय मोबाईल आयएमईआय नंबरला ब्लॉक करण्यात आले आहे.
रजनीकांतच्या ‘जेलर’चा सिक्वेल येतोय!
तामीळ स्टार रजनीकांतचा येत्या 12 डिसेंबरला
74 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त रजनीकांतच्या ‘जेलर’ चित्रपटाच्या सिक्वेलचा प्रोमो रिलीज करण्यात येणार आहे. चित्रपटाचे निर्माते 12 डिसेंबरला या चित्रपटाबद्दल माहिती उघड करणार आहेत.
हैदराबादमध्ये बिर्याणीत आढळली सिगारेट
हैदराबाद हे बिर्याणीसाठी प्रसिद्ध शहर आहे, परंतु येथील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये बिर्याणीत सिगारेट आढळली. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ग्राहक रेस्टॉरंटच्या कर्मचाऱयांशी हुज्जत घालताना व्हिडीओत दिसत आहेत.
’पुष्पा-2’ 12 हजार स्क्रीनवर प्रदर्शित होणार
अल्लू अर्जुन, मंदाना यांचा बहुचर्चित चित्रपट पुष्पा-2 येत्या 5 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. चाहत्यांना पुष्पा-2ची उत्सुकता लागली आहे. पुष्पा जगभरात 12 हजारांहून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे. याआधी हा चित्रपट साडे अकरा हजार स्क्रीनवर प्रदर्शित होणार होता.