जगभरातून महत्त्वाच्या बातम्या…

दिवसातून एकदा तरी हसण्यासाठी जपानमध्ये आला नवा नियम

गेल्या आठवडय़ात जपानमधल्या यामागाटा भागातील नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रशासनाने अनोखे पाऊल उचलले. प्रशासनाने केलेल्या नियमानुसार, लोकांना दिवसातून एकदा तरी हसणं बंधनकारक आहे. तिथल्या युनिव्हर्सिटीत करण्यात आलेल्या संशोधनामुळे हा नियम करण्यात आला. यामागाटा युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनानुसार हसल्यामुळे आरोग्यामुळे अनेक फायदे होतात. हृदयाचे विकार कमी होतात. माणसांचे आयुर्मान वाढते. म्हणूनच लोकांना तणावमुक्त, आनंदी वातावरण राखण्यासाठी प्रोत्साहन दिले जातंय.

अडचणींवर मात; यूपीएससी केली पास

यूपीएससीने पेंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) भरती परीक्षा 2023 चा निकाल जाहीर केला. यामध्ये असिस्टंट प्रोव्हिडंट फंड कमिशनर पदासाठी 159 उमेदवार यशस्वी ठरले आहेत. उत्तर प्रदेशच्या बांदा येथील विवेक कुमार गुप्ताने 20 वा क्रमांक पटकावला. त्यांची निवड ईपीएफओमध्ये असिस्टंट कमिशनर पदासाठी झाली आहे. दुसऱया प्रयत्नांत त्याने हे यश मिळवले. विवेकच्या वडिलांचे मोबाईल रिचार्जचे दुकान आहे. आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसताना त्यांनी विवेकला उच्च शिक्षण दिले. अनेक अडचणी येऊनही विवेकने हार मानली नाही. मुलाच्या यशाने सारे भरून पावल्याची प्रतिक्रिया विवेकचे वडील आशीष गुप्ता यांनी दिली.

शेतकऱ्याच्या लेकीची कौतुकास्पद कामगिरी

उत्तर प्रदेशच्या बांदा जिह्यातील शेतकरी अनिल अवस्थी यांनी मुलांच्या शिक्षणासाठी गाव सोडून लखनौला जायचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या लेकीने सार्थ ठरवला. अनिल अवस्थी यांची धाकटी मुलगी राधा अवस्थी हिने पहिल्याच प्रयत्नांत यूपीएससीची परीक्षा व्रॅक केली. तिच्या यशाने अनिल अवस्थी यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. माझ्या मुलांनी माझा संकल्प पूर्ण केला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

सुकेश चंद्रशेखरच्या 26 लक्झरी कारचा लिलाव

200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक असलेला आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्या महागडय़ा लक्झरी कारचा लिलाव करण्यास दिल्ली हायकोर्टाने ईडीला परवानगी दिली आहे. कोर्टाकडून परवानगी मिळाल्यामुळे ईडी आता 26 लक्झरी कारचा लिलाव करणार आहे. या कारमध्ये रोल्स रॉयस, रेंज रोवर आणि फरारी यासारख्या महागडय़ा आणि लक्झरी कारचा समावेश आहे.

जगन्नाथ मंदिराचे रत्न भांडार आज पुन्हा उघडणार

भुवनेश्वरातील पुरी येथील जगन्नाथ मंदिराचा रत्न भांडार उद्या गुरुवारी पुन्हा एकदा उघडण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी 9.15 वाजल्यापासून दुपारी 12.15 वाजेपर्यंत रत्न भांडार उघडे राहणार आहे. रत्न भांडार समितीचे अध्यक्ष न्यायाधीश विश्वनाथ रथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंदिरातील रत्न भांडारच्या आतील खोल्या उघडण्यात येणार आहे.