पाकिस्तानला जाणे टाळा; अमेरिका
पाकिस्तानला जाणे टाळावे, असा सल्ला अमेरिकेने आपल्या नागरिकांना दिला आहे. 16 डिसेंबरपर्यंत पाकिस्तानात जाऊ नका, असेही अमेरिकन दूतावासाने म्हटले. सेरेना हॉटेल, पेशावरला धोका आहे, असे सांगत अमेरिकी दूतावासाच्या कर्मचाऱयांनाही हॉटेलला न जाण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा आणि आसपासच्या क्षेत्रातील परिस्थिती सध्या बिघडली आहे. दहशतवाद्यांनी अनेक ठिकाणी गोळीबार आणि स्फोट घडवले आहेत. त्यामुळे अमेरिकेने अलर्ट केले आहे.
विमान कंपन्यांना 994 बॉम्बच्या धमक्या
हिंदुस्थानात 2024 मध्ये तब्बल 994 बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. माहिती नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संसदेत ही माहिती दिली. खासदार कार्तिकेय शर्मा यांनी विचारलेल्या विमान वाहकांनी नोंदवलेल्या बॉम्बच्या धमक्यांबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. ऑगस्ट ते डिसेंबर 2022 दरम्यान तब्बल 27 फसव्या बॉम्बच्या धमकीचे कॉल आले. 2023 मध्ये ही संख्या 122 पर्यंत वाढली, तर चालू वर्षात नोव्हेंबर 2024 च्या मध्यापर्यंत 994 कॉल्स नोंदवले गेले, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्यूरो, विमान वाहतूक सुरक्षा नियामक, त्यांच्या बॉम्ब थ्रेट आकस्मिक योजना अंतर्गत मजबूत प्रोटोकॉल लागू केले आहेत, असेही मोहोळ म्हणाले.
महिलांसाठी उबरचे ऑडिओ फीचर
उबरने आपल्या प्रवाशांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी तीन नवीन फीचर्स आणले आहेत. या फीचरमध्ये महिला प्रवासी आणि चालकांकडे खास लक्ष दिले आहे. यात ऑडिओ रेकार्ंडग, महिला रायडरला प्राधान्य दिले आहे. यासाठी उबरने बंगळुरूमधील एनजीओ दुर्गासोबत पार्टनरशिप केली आहे. यामुळे आता उबर प्रवाशांना राइडचेक, शेअर माय ट्रिप आणि ऑडिओ रेकार्ंडगची सुविधा मिळेल. 95 टक्के महिला या उबरने प्रवास करणे सुरक्षित मानतात़ उबरसोबत प्रवाशांना खूप सारे सेफ्टी फीचर्स मिळणार आहेत, असे उबरच्या सूरज नायर यांनी सांगितले.
सोन्याच्या दरात घसरण; चांदी पुन्हा महागली
सोन्याच्या दरात घसरण होत असून गुरुवारी सोन्याच्या भावात 259 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. एकीकडे सोने स्वस्त होत असताना चांदीच्या किमतीत मात्र वाढ झाली आहे. चांदी आज 468 रुपयांनी महाग झाली. सोन्याचा 24 कॅरेटचा भाव कमी होऊन प्रति 10 ग्रॅम 75 हजार 916 रुपयांवर पोहोचला, तर चांदीचा दर वाढून प्रति किलो 88,898 रुपयांवर पोहोचली आहे.
आता थेट पुण्याहून बँकॉकसाठी फ्लाईट
टाटा समूहाचे एअर इंडिया एक्स्प्रेसने आपले नेटवर्क वाढवले आहे. आता कंपनीने सुरत आणि पुणे या दोन ठिकाणांहून बँकॉकला जाण्यासाठी नवीन उड्डाण सेवा सुरू करण्याचे ठरवले असून ही सेवा पुढील महिन्यात 20 डिसेंबर 2024 पासून सुरू केली जाणार आहे. या नवीन उड्डाणासह बँकॉक हे एअरलाईन्सचे 51 वे आंतरराष्ट्रीय थांबा बनणार आहे.
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स-निफ्टीत दाणादाण
शेअर बाजारात गुरुवारी जोरदार आपटी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1190 अंकांनी घसरून 79,043 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 360 अंकांनी घसरून 23,914 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 29 शेअर्स घसरले. सर्वात जास्त नुकसान इन्फोसिसला सोसावे लागले.
आयडीबीआय बँकेत अधिकारी पदांची भरती
आयडीबीआय बँक लिमिटेडमध्ये ‘ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड-ओ जनरालिस्ट’ आणि ‘स्पेशालिस्ट ऍग्री असेट ऑफिसर’ पदांची भरती केली जात आहे. पात्र उमेदवारांनी 30 नोव्हेंबरपर्यंत बँकेची अधिकृत वेबसाईट www. idbibank.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावेत. मुंबई विभागासाठी 125, नागपूरसाठी 50, पुणे विभागासाठी 60 पदे राखीव आहेत.