देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी…

अबब! एक किलो वजनाचा फोन

देश-विदेशात वेगवेगळ्या कंपन्या स्मार्टफोन लाँच करत असतात. यात वेगवेगळी फीचर्स दिली जातात. परंतु, आता तब्बल एक किलो वजनाचा फोन लाँच करण्यात आला आहे. या फोनचे नाव टँक 3 असून याला यूनिहर्ट्ज कंपनीने बनवले आहे. हा 5जी फोन आहे. कुवेतमध्ये या फोनची किंमत 80 केडी म्हणजे 23 हजार रुपयांना मिळत आहे. या फोनच्या मागे सोलर चार्ंजग सिस्टम सुद्धा देण्यात आली आहे. म्हणजे हा फोन उन्हात ठेवल्यानंतर चार्ज होईल. हा फोन एकदा चार्ज केल्यानंतर याला एक महिना वापरू शकता येईल. या फोनचा व्हिडीओ कुवेतील एका ब्लॉगरने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. एक किलो वजनाच्या फोनमध्ये 16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज दिले आहे. या फोनमध्ये 200 मेगापिक्सलचा कॅमेरा दिलाय. फोनमध्ये 23,800 एमएएच क्षमतेची बॅटरी दिलीय.

पेटीएमला तिसऱया तिमाहीत 208 कोटींचा तोटा

वन 97 कम्युनिकेशन कंपनीच्या पेटीएमला 2024-2025 आर्थिक वर्षाच्या तिसऱया तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत 208 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत पेटीएमचा तोटा 220 कोटी रुपये होता. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल 36 टक्के घसरून 1828 कोटी रुपये झाला. दुसऱया तिमाहीत पेटीएमचा निव्वळ नफा 930 कोटी रुपये होता.

व्यावसायिकाची 11 कोटींची फसवणूक

बंगळुरू येथील एका व्यावसायिकाची सायबर फसवणूक करण्यात आली. सायबर चोरांनी तब्बल 11 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. विजय कुमार असे या व्यावसायिकाचे नाव असून हा व्यावसायिक माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहे.

26 जानेवारीपर्यंत दिल्ली विमान वाहतुकीत बदल

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 26 जानेवारीपर्यंत दररोज सकाळी 10.20 ते दुपारी 12.45 वाजेपर्यंत जवळपास 145 मिनिटे कोणत्याही विमानाचे टेकऑफ किंवा उड्डाण होणार नाह़ी

‘इमर्जन्सी’ने तीन दिवसांत कमावले दहा कोटी

कंगना रनौत हिच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद मिळत आहे. 17 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा विकेंडमध्ये केवळ दहा कोटी रुपये कमावले आहेत.

नोकरी! युको बँकेत 250 पदांसाठी भरती सुरू

युको बँकेत 250 स्थानिक बँक अधिकारी पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. पदवी असलेल्या उमेदवारांना बँकेत नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. नोकरीसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे.