इंडिगो विमानात पुन्हा बॉम्बची अफवा
चेन्नईहून मुंबईला जाणाऱया इंडिगोच्या विमानात मंगळवारी (18 जून) बॉम्बची धमकी मिळाली. यानंतर रात्री 10.30 वाजता विमान मुंबई विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले. नवी दिल्लीतील इंडिगोच्या कॉल सेंटरमध्ये बॉम्बच्या धमकीचा संदेश आला होता. गेल्या 22 दिवसांमधील धमकी देण्याची ही तिसरी घटना आहे. लँडिंगनंतर फ्लाइटला प्रोटोकॉलनुसार आयसोलेशन बे मध्ये नेण्यात आले. या ठिकाणी सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. 1 जून रोजी चेन्नईहून मुंबईला जाणाऱया विमानात बॉम्बची धमकी मिळाली होती.
एअर इंडिया विमानात प्रिमिअम इकोनॉमी सीट्स
एअर इंडिया काही डोमेस्टिक रुट्सवर कमी पल्ल्याच्या विमानांमध्ये प्रिमिअम इकोनॉमी क्लास केबिन देणार आहे. जुलै महिन्यापासून ही सुविधा उपलब्ध होईल. सध्या फक्त विस्तारा ही कंपनी डोमेस्टिक रुटवर प्रिमिअर इकोनॉमी क्लास सेवा देते. एअर इंडियाने पहिल्यांदा छोटया आकाराच्या विमानामध्ये प्रीमियर इकॉनॉमी केबिन उपलब्ध करून दिलंय. – एअर इंडियाच्या दिल्ली – बंगळुरू- दिल्ली आणि दिल्ली- चंदिगढ- दिल्ली या दोन निवडक मार्गावर प्रिमीअम इकॉनॉमी सीट्स उपलब्ध असतील, असे आज एअर इंडियाने सांगितले.
अभिषेकने खरेदी केले सहा आलिशान फ्लॅट
बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन याने मुंबईत बोरिवली येथे ओबेरॉय रियॅल्टीच्या ओबेरॉय स्काय सिटी प्रकल्पात 15.42 कोटी रुपयांना सहा फ्लॅट खरेदी केल्याचे समजते. कागदपत्रांनुसार, बॉलीवूड अभिनेत्याने 31,498 रुपये प्रति चौरस फूट दराने एकूण 4,894 चौरस फूट रेरा कार्पेटचे हे फ्लॅट खरेदी केले आहेत. बोरिवली पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या या इमारतीच्या 57 व्या मजल्यावर हे सहा अपार्टमेंट आहेत. त्यांची नोंदणी 28 मे 2024 रोजी करण्यात आली आहे. इमारतीला नुकतीच ओसी मिळालेली आहे.
चॉकलेट सिरपमध्ये आढळला मेलेला उंदीर
तुम्हीदेखील तुमच्या मुलांना चॉकलेट सिरप देत असाल तर सावधान… एका महिलेने ऑनलाईन ऑर्डर केलेल्या हर्षे कंपनीच्या चॉकलेट सिरपमध्ये चक्क मेलेला उंदीर सापडला आहे. या महिलेने झेप्टो या शॉपिंग ऍपमधून हे चॉकलेट सिरप ऑर्डर केले होते. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ प्रमी श्रीधर नावाच्या युजरने सोशल मीडियावर अपलोड केला आहे.
बजाजची पहिली सीएनजी बाईक येतेय!
बजाज ऑटो कंपनीची पहिली सीएनजी बाईक 5 जुलै रोजी लाँच होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हेदेखील या बाईकच्या लॉचिंग कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या बाईकमध्ये कोणते फीचर्स असणार आहेत, हे बाईक लाँच झाल्यानंतर स्पष्ट होईल. बाईकचे इंजिन 100 ते 125 सीसी या रेंजमध्ये असण्याची शक्यता वर्तवली आहे.
ऍमेझॉनचा बॉक्स उघडताच निघाला साप
बंगळुरूमध्ये राहणाऱया एका जोडप्याने अमेझॉनवरून आय बॉक्स कंट्रोल मागवले. परंतु ऍमेझॉनकडून पाठवण्यात आलेला
बॉक्स उघडताच या बॉक्समधून चक्क साप बाहेर पडला. या घटनेमुळे हे जोडपे प्रचंड घाबरले असून त्यांनी ऍमेझॉनकडे तक्रार दाखल केली. कंपनीने माफी मागितली. तसेच संपूर्ण पैसेही रिफंड केले आहे.