नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार करता येत नाही, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार करता येत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. प्रेयसी ही नातेवाईकाच्या व्याख्येत येत नाही, या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत न्यायालयाने हा निर्वाळा दिला.

कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा रद्द करण्यासाठी प्रेयसीने याचिका केली होती. न्या. अजय गडकरी व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने पतीच्या प्रेयसीविरोधात नोंदवलेला गुन्हा रद्द केला. याचिकाकर्तीविरोधातील गुन्हा रद्द न केल्यास कायद्याचा अवमान होईल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

तिच्यामुळे दाबला गळा

पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचे एकाने फोन करून सांगितले. पत्नीने पतीचा फोन चेक केला. फोनमध्ये पतीचे व प्रेयसीचे फोटो होते. हे फोटो बघून पत्नीने पतीला जाब विचारला. पतीने उत्तर देण्यास टाळाटाळ केली. दारूच्या नशेत पतीने प्रेयसीला सोन्याच्या बांगड्या व हार दिला. याचा पत्नीने विरोध केला. पतीने पत्नीचा गळा पकडून दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीत करण्यात आला होता. पोलिसांनी याचा गुन्हा नोंदवला. हा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका प्रेयसीने दाखल केली होती. ही याचिका खंडपीठाने मंजूर केली.

नातेवाईकाची व्याख्या

नाते हे रक्ताचे असते, विवाहानंतर तयार होते अथवा दत्तक घेतल्यावर ते मानले जाते. जर विवाहच झाला नसेल तर नाते असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात स्पष्ट केले आहे. कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार असलेली महिला तक्रारदार महिलेच्या पतीची प्रेयसी आहे. त्यामुळे तिच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने नमूद केले.