
दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव मिळावा व दूध प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी दुधाला एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आलेली आहे अशी माहिती डॉक्टर अजित नवले यांनी दिले आहे
आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये राज्यभर झालेल्या आंदोलनांचा आढावा घेऊन दुसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. आंदोलनाच्या या टप्प्यामध्ये 15 जुलै ते 21 जुलै या आठवडाभराच्या कालावधीमध्ये राज्यभर स्थानिक पातळीवर तीव्र आंदोलने करण्याची हाक दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दिली आहे. 2009 पासून आजतागायत राज्यभर झालेल्या विविध आंदोलनांमध्ये सहभागी असलेल्या राज्यभरातील संघटना, नेते व कार्यकर्त्यांनी मिळून आकाराला आलेल्या दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची ऑनलाईन बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये राज्यभरातील 47 प्रमुख नेते, कार्यकर्ते व विचारवंतांनी सहभाग नोंदवला.
राज्यभर सुरू असलेल्या दूध आंदोलनामध्ये मागण्यांच्या पातळीवर व कृतीच्या पातळीवर समन्वय साधण्याचे काम दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सुरू आहे. संघर्ष समितीच्या बैठकीमध्ये आजवर झालेल्या आंदोलनांचा आढावा घेऊन आगामी काळात करावयाच्या आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये कोतुळ या ठिकाणी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा नववा दिवस असूनही या आंदोलनाकडे सरकारने हेतूतः दुर्लक्ष चालवले आहे. राज्यभरात विविध ठिकाणी होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मंत्रालय स्तरीय बैठकीत सुद्धा दूध उत्पादकांच्या मागण्या फेटाळून लावण्यात आल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर दिनांक 15 जुलै ते 21 जुलै या कालावधीमध्ये संघर्ष समिती सहभागी असणाऱ्या संघटना, नेते आणि कार्यकर्ते स्थानिक पातळीवर विविध प्रकारच्या आंदोलनांना चालना देणार आहेत. धरणे आंदोलने, दुग्धाभिषेक, दूध हंडी, दूध परिषदा, मोटार सायकल रॅली, पायी दिंडी, निदर्शने, लोकप्रतिनिधींच्या भेटी, लाक्षणिक उपोषणे व रास्ता रोकोच्या माध्यमातून सबंध आठवडाभर ठिकठिकाणी आपल्या मागण्यांकडे दूध उत्पादक सरकारचे लक्ष वेधणार आहेत. सबंध आठवडाभर तीव्र आंदोलने करूनही सरकारने जर मागण्यांची दखल घेतली नाही तर सर्व राज्यभरातील ताकद एकत्र करून जबरदस्त आंदोलनात्मक कृती राज्याच्या केंद्रस्थानी संघटित करण्यात येईल, असा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.
बैठकीसाठी डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, इंजिनीयर सतीश देशमुख, ऍड. अजित काळे, दादासाहेब कुंजीर, ज्योतीराम जाधव, अशोक ढगे, रामनाथ वदक, राजकुमार झोरी, दीपक अण्णा काटे, केशव जंजाळे, ऍड. श्रीकांत करे, दत्ता ढगे, आप्पा अनारसे, दीपक वाळे, ऍड.अतुल पवार, जयराम खडके, संतोष रोहम, दत्तात्रय कड, कृष्णा घुगरे, सदाशिव साबळे, नंदू रोकडे, निलेश तळेकर, रवींद्र हासे, रवींद्र पवार, पंकज पडवळ, दीपक पानसरे, ज्ञानेश काळे, माणिकराव अवघडे, दादा गाढवे, महेश जेधे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.