‘ग्रेट निकोबार’ विकास प्रकल्पाचे महत्त्व

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

अंदमान-निकोबार बेटांवर एक प्रमुख लष्करी पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू आहे. एअरफिल्ड व जेटी सुधारणे, अतिरिक्त रसद व साठवणूक सुविधा, लष्करी कर्मचाऱयांसाठी तळ, गस्त घालण्यासाठी व पाळत ठेवण्यासाठी पायाभूत सुविधा यांचा समावेश आहे. द्वीपसमूहाच्या सभोवतालच्या संपूर्ण क्षेत्रावर बारीक पाळत ठेवणे आणि ग्रेट निकोबार येथे मजबूत लष्करी प्रतिबंध उभारणे हे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळेसुद्धा या प्रकल्पाला महत्त्व आहे.

भारत सरकारने ग्रेट निकोबारच्या विकासासाठी ‘महापायाभूत सुविधा प्रकल्प’ तयार केला आहे. हा प्रकल्प ‘अंदमान आणि निकोबार आयलंड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’द्वारे राबवण्यात येत आहे. पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने 2022 मध्ये या प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी दिली. हा प्रकल्प 72 हजार कोटी रुपयांचा असून पुढील 30 वर्षांत तो राबवला जाणार आहे. या प्रकल्पाद्वारे येथे ‘इंटरनॅशनल कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल’ उभारण्यात येणार असून 4000 प्रवाशांना हाताळण्याची क्षमता त्यात आहे. ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ, गॅस व सौर ऊर्जा प्रकल्प, त्यासह प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱया कर्मचाऱयांसाठी टाऊनशिप उभारण्यात येणार आहे. 16,610 हेक्टरवर हा प्रकल्प उभारण्यात येत आहे.

केंद्रीय जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयातर्फे ग्रेट निकोबार बेटांशी संलग्नित गॅलाथिया खाडीवर मेगा इंटरनॅशनल कंटेनर ट्रान्सशिपमेंट पोर्ट म्हणजेच आंतरराष्ट्रीय पारगमन बंदर विकसित करण्यात येणार आहे. याशिवाय विमानतळ, नागरी वसाहत विकसित करणे आणि वीज प्रकल्प यांचे काम करण्यात येणार आहे. इथल्या पायाभूत सुविधा या जगातील सर्वोत्तम ‘कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल’ आणि आसपासच्या बंदरांमध्ये उपलब्ध करून दिलेल्या सेवासुविधांच्या गुणवत्तेशी बरोबरी साधणाऱया असतील.

या प्रकल्पाच्या परिचालनाशी संबंधित तीन प्रमुख घटकांवर भर दिला आहे, ज्यामुळे हे ठिकाण एक आघाडीचे ‘कंटेनर ट्रान्सशिपमेंट पोर्ट’ म्हणजेच एका जहाजावरून माल उतरवून तो इच्छित स्थानी पाठविण्यासाठी, पुढच्या प्रवासासाठी दुसऱ्या जहाजावर चढविण्याची सुविधा असलेले बंदर बनू शकणार आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय शिपिंग व्यापारी मार्ग सागरी 40 मैल अंतरावर आहे. तसेच मोठय़ा जहाजांसाठी आवश्यक असणारी पाण्याची 20 मीटरपेक्षा जास्त नैसर्गिक खोली उपलब्ध आहे. भारतीय बंदरांसह नजीकच्या परदेशी बंदरांमधून ट्रान्सशिपमेंट कार्गोची वाहतूक करण्याची क्षमता असल्यामुळे या ठिकाणाला महत्त्वाचे स्थान मानले जाते.

मात्र काही पर्यावरणप्रेमी या विकास प्रकल्पामुळे ग्रेट निकोबार बेटाच्या पर्यावरणाला धोका निर्माण होण्याच्या कारणास्तव त्याला विरोध करत आहेत. त्यांना वाटते की, येथील आदिवासीच्या जीवनावर या प्रकल्पामुळे प्रभाव पडेल. तसे होणार नाही. शॉम्पेन, निकोबारीज या आदिवासींची संख्या हजाराहूनसुद्धा कमी आहे.

या बेटाची लोकसंख्या 8500 असून शॉम्पेन, निकोबारीज या आदिवासींसह काही हजार गैर-आदिवासी तिथे राहतात. या बेटावर शॉम्पेन आदिवासी केवळ 100 आहेत. शॉम्पेन जमातीचा बेटावरील नागरी वस्त्यांशी फारसा संवाद नाही. ते बेटाच्या जंगलात, किनारपट्टीपासून दूर राहतात आणि शिकारी जीवन जगतात.
याशिवाय मोठय़ा संख्येने सरकारी कर्मचारी येथे उपस्थित आहेत. येथे नौदल, तटरक्षक दल आणि सैन्य तैनात आहे. इतर सरकारी कर्मचाऱयांमध्ये BSNL दूरसंचार सेवा, पोस्ट ऑफिस आणि राज्य परिवहन सेवेसाठी काम करणाऱयांचा समावेश होतो.

काही निकोबारी आदिवासी हे भारतीय सैन्याच्या टेरिटोरियल आर्मीमध्ये सामील आहेत. या प्रकल्पामुळे काही लाख झाडे कापली जातील असा एक आक्षेप आहे, पण हे बरोबर नाही. कारण इथे वर्षातून नऊ महिने पाऊस पडत असतो आणि इथली जंगले ही एव्हरग्रीन आहेत व इतकी घनदाट आहेत की, जंगलाच्या आत जाणे अशक्य असते. त्यामुळे या बेटांना लाकडांची एक वखारच समजली जाते.

सामरिक महत्त्व
बंगालचा उपसागर आणि हिंद महासागर क्षेत्र हे भारतासाठी सामरिकदृष्टय़ा आणि सुरक्षा हितासाठी महत्त्वाचे क्षेत्र आहे. चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्ही या संपूर्ण क्षेत्रात आपला विस्तार करत आहे. या क्षेत्रातील मलाक्का, सुंदा आणि लोंबोकच्या हिंद-प्रशांत महासागर चेक पॉइंट्सवर चीन सागरी सैनिक तळ उभारत आहे. त्यासाठी ग्रेट निकोबार विकास प्रकल्पाला महत्त्व आहे. या बेटांना अनेक पारंपरिक व अपारंपरिक सुरक्षा धोके आहेत, जसे की चाचेगिरी, तस्करी, अमली पदार्थ, अवैध मानवी वाहतूक, अवैध शस्त्रास्त्र वाहतूक आणि अवैध मासेमारी. याकरिता भारतीय सुरक्षा दलांचा इथे तळ आहे.

अंदमान-निकोबार द्वीप समूह हा बंगालच्या उपसागरामध्ये स्थित आहे. या उपसागरामध्ये चिनी सैन्याची तैनाती खूपच वाढली आहे. अंदमानच्या पूर्वेला कोको आयलँड्समध्ये चिनी लष्करी तळ असावा. याशिवाय बांगलादेशच्या चितगाव बंदरामध्ये चिनी नौदलाची उपस्थिती आहे आणि तिथे दोन पाणबुडय़ा चिनी नौसैनिक चालवत आहेत. याशिवाय म्यानमारच्या सितवे बंदरामध्ये चिनी सैन्याची उपस्थिती आहे. हंबनतोता हे श्रीलंकेचे बंदर चिनी सैन्याचे लष्करी तळ आहे. त्यामुळे या भागामध्ये अंदमान-निकोबार समूहाचे रक्षण करण्याकरिता तयारी करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

अत्यंत महत्त्वपूर्ण समुद्र जलमार्गिकेच्या संगमावर वसलेली असल्याने ही बेटे इतर सत्तांनाही महत्त्वाची वाटतील. अंदमान व निकोबार द्वीपसमूह म्हणजे न बुडणाऱया चार विमानवाहक नौकाच आहेत. ही द्वीपसाखळी स्वसंरक्षणाव्यतिरिक्त भारताची पूर्वेकडे राष्ट्रीय हित साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणून या बेटांचा सर्वांगीण विकास आवश्यक आहे.

[email protected]