धूळ प्रदूषण नियंत्रण नियमांची अंमलबजावणी करा, अन्यथा इंजिनीअरवर शिस्तभंगाची कारवाई

मुंबईत वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने कठोर पावले उचलली असून प्रत्येक वॉर्डमध्ये धूळ प्रदूषण नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, अन्यथा सहाय्यक अभियंत्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे. याबाबत पालिकेने आज सुधारित नियमावली जाहीर केली. यानुसार धूळ प्रदूषण, डेब्रिज फेकणाऱ्यांवर नजर ठेवून केलेल्या कारवाईचा अहवाल प्रत्येक आठवडय़ाला प्रमुख अभियंता आणि उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) यांना सादर करणे बंधनकारक राहणार आहे. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता खालावल्याने प्रदूषण वाढले आहे. हे प्रदूषण मुंबईतील विविध बांधकामांमधून उडणारी धूळ, रस्ते कामे आणि डेब्रिजमधून उडणाऱया धुळीमुळे वाढल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालिकेने सर्व वॉर्डना सक्त निर्देश देत जाहीर केलेल्या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होते की नाही यावर नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. नियम मोडणाऱयांवर केलेल्या कारवाईचा अहवालही तयार करावा लागणार आहे.

अशी आहे नियमावली

 बांधकामे, रस्ते पंत्राटदारांनी कामाच्या ठिकाणी धूळ नियंत्रण यंत्रणा सक्षम ठेवावी.
 उघडय़ा वाहनातून डेब्रिजची वाहतूक करू नये. नागरिकांनी ‘डेब्रिज ऑन कॉल’ योजनेचा वापर करावा.
 रस्त्यांची स्वच्छता करताना धूळ उडू नये यासाठी अत्याधुनिक पद्धत वापरावी.
 रस्त्यांवरील धूळ, डेब्रिज, कचरा नियमित उचलण्याची कार्यवाही करावी.
 आवश्यक त्या ठिकाणी रस्ते पाण्याने धुवावेत, स्प्रिंकलरचा वापर करावा.
 उघडय़ावर कचरा जाळू नये.