मुंबई-गोवा महामार्गाच्या लटकलेल्या कामामुळे आज माणगावमध्ये ट्रॅफिकचा अक्षरशः ‘हँगओव्हर’ झाला. गेल्या अनेक वर्षांपासून येथील बायपासचे काम रखडले असून वाहने शहरातील जुन्या मागनिच ये-जा करत आहेत. आजही थर्टी फर्स्टचा जल्लोष आणि नववर्षाचे स्वागत करून परतीच्या प्रवासाला लागलेले मुंबई, ठाण्यातील हजारो पर्यटक तसेच चाकरमानी वाहतूककोंडीत अडकले. या भागात तब्बल पाच किमी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे थर्टी फर्स्टचा जल्लोष करून आनंदाने घरी निघालेल्या पर्यटकांच्या संतापाचा ‘प्याला’ ओसंडून वाहात होता. महामार्गाच्या रडतखडत सुरू असलेल्या कामाविरोधात अनेकांनी शिव्यांची लाखोलीच वाहिली. माणगावबरोबरच वडखळ-अलिबाग, पेण-रामवाडी या भागातील काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
मुंबई, ठाण्यातील हजारो पर्यटकांसह चाकरमान्यांची रखडपट्टी
■ मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या 15 वर्षांपासून रडतखडत सुरू आहे. डांबरीकरण बोंबलल्यानंतर भाजप सरकारने पनवेल ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याची घोषणा केली. मात्र वडखळपासून माणगावपर्यंत काँक्रीटीकरणाचे काम अपूर्ण राहिले असून दिवसेंदिवस अपघात वाढत आहेत.
■ माणगाव येथील बायपासचे काम लटकल्याने याचा फटका आज हजारो पर्यटकांना बसला. या भागात पाच किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला. माणगावप्रमाणेच वडखळ, पेण या भागातही सकाळी ट्रॅफिक झाली होती. तसेच अलिबागहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पर्यटकांनादेखील वाहतूककोंडीचा सामना करावा लागला.
तारीख पे तारीख बंद करा
थर्टी फर्स्टचा जल्लोष करण्यासाठी मुंबई, ठाण्यातील हजारो पर्यटकांनी रायगडातील समुद्रकिनाऱ्यांना भेटी दिल्या. तर काहींनी नवीन वर्षाचे स्वागत देवदर्शनाने केले. मात्र दोन दिवसांच्या उत्साहानंतर घरी परतणाऱ्या या चाकरमान्यांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. यामुळे पर्यटकांनी चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी सरकारकडून दिली जाणारी तारीख पे तारीख बंद करावी, असा संताप व्यक्त केला.