मराठीत बोल असे सांगितल्याने मुजोर परप्रांतीय फळविक्रेत्यांनी विशाल गवळी या तरुणालाच कान धरून माफी मागायला लावल्याची संतापजनक घटना आज मुंब्य्रात घडली. महाराष्ट्रात राहायचे असेल तर तुला मराठीत बोलावेच लागेल, असा आग्रह या तरुणाने धरला. पण त्याची शिक्षा म्हणून त्याला चक्क हिंदीतून माफी मागायला भाग पाडण्यात आले. सर्वात कहर म्हणजे मुंब्रा पोलिसांनी मराठी तरुणाची बाजू न घेता परप्रांतीय फळविक्रेत्यांच्या तक्रारीवरून त्या तरुणावरच अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
कल्याणमधील शुक्ला कुटुंबाने शेजारी राहणाऱ्या मराठी कुटुंबाला क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. कल्याणसह मुंबई, वसई व अन्य भागांत वारंवार मराठी भाषेचा व मराठी माणसांचा अपमान केला जात आहे. आज मुंब्य्रात विशाल गवळी हा मराठी तरुण बाजारात फळे विकत घेण्यासाठी एका विक्रेत्याकडे गेला होता. विशाल याने मराठीत फळांचा भाव विचारला असता फळविक्रेता शोएब कुरेशी हा संतापला व तो म्हणाला की, मला मराठी येत नसल्याने तू हिंदीमधून बोल. विशाल गवळी याने महाराष्ट्रात राहून तुला मराठी का येत नाही, असे खडसावले. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे भांडणात रूपांतर होत असतानाच मोठय़ा प्रमाणावर जमावदेखील जमला.
आयडीयल मार्केट, कौसा येथे फळविक्रेता शोएब कुरेशी व विशाल गवळी यांच्यामध्ये मराठी भाषेमधून बोलण्यावरुन झालेल्या वादावादी व शिवीगाळ झाली. त्यानंतर विशाल गवळी याचे विरोधात मुंब्रा पोलीस ठाणे येथे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असतानाच अब्दुल अन्सारी याच्यासह 20 ते 25 जणांनी मुंब्रा पोलीस ठाणे येथे बेकायदा जमाव जमवून पोलीसांविरोधात घोषणाबाजी केली. आम्ही सांगतो तसेच गुन्हे दाखल करा, आरोपीला तत्काळ अटक करा असे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि मनाई आदेशाचे उल्लंघन केले. त्यानुसार मुंब्रा पोलिसांनी 37(3), 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक करून प्रतिबंधक कारवाई करत असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली.
दमबाजी आणि शिवीगाळ
परप्रांतीय शोएब कुरेशी याने आजूबाजूचे विक्रेते साथीदारही गोळा झाले आणि त्यांनी मराठमोळय़ा विशालला अक्षरशः घेरले. तसेच त्याला दमबाजी केली. काही जणांनी तर विशाल याला शिवीगाळदेखील केली. अखेर त्याला फळविक्रेत्यांनी कानाला धरून हिंदीत माफी मागायला भाग पाडले. या घटनेची माहिती कळताच मुंब्रा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाद सोडवण्याऐवजी विशाल गवळी यालाच पोलीस स्टेशनला आणले आणि त्याच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या या एकतर्फी भूमिकेमुळे संताप व्यक्त होत आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
मराठीतून बोलण्याचा आग्रह आणि त्यानंतर झालेली बाचाबाची याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून सोशल फ्लॅटफार्मवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून महाराष्ट्रात मराठी बोला असे सांगणे हा गुन्हा आहे काय, असा सवालही विचारला जात आहे.
आई म्हणते, माझा मुलगा आजारी आहे
फळविक्रेत्याला मराठीतून बोलण्याचा आग्रह धरणारा विशाल गवळी याची आई कमला गवळी यांनी सांगितले की, माझा मुलगा सध्या आजारी आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून तो अधूनमधून चिडचिड करतो. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करू नये, अशी मागणीही आईने केली आहे.