विशाळगडावरील ‘अतिक्रमण हटाव मोहीम’ तत्काळ पुन्हा सुरू करा ! हिंदू एकता आंदोलनाचे मागणीसाठी निदर्शने

विशाळगडावरील अतिक्रमणे हटविण्याची बंद असलेली मोहीम तातडीने सुरू करावी. मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिक रेहान बाबाच्या दग्र्याचे अतिक्रमण जमीनदोस्त करावे. येथील उरुसाला कायमस्वरूपी बंदी करावी. कोणत्याही प्रकारची पशुहत्या गडावर करण्यात येऊ नये, तसेच किल्ले विशाळगडावर नरवीर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजीप्रभू देशपांडे यांचे स्मारक उभे करण्यात यावे आदी मागण्यांसाठी गुरुवारी (23 रोजी) हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आली. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले.

ऐतिहासिक किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली होती. पावसाळ्यामुळे अनधिकृत बांधकाम तोडता येणार नाही, असे आदेश न्यायालयाने दिले होते. आता हिवाळा संपत आला, तरी उरलेली अनधिकृत बांधकामे काढण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने सुरू केलेली नाहीत. यामुळे आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध हिंदुत्ववादी संघटनांसह हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

आंदोलनानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चेवेळी 10 बाय 10 च्या थडग्याच्या सभोवती सुमारे 20 हजार स्क्वेअर फूट बांधकाम बेकायदेशीरपणे केले असून, खोल्या बांधलेल्या आहेत. विशाळगड अतिक्रमणमुक्त होत नाही, तोपर्यंत विशाळगड पर्यटकांसाठी खुला करू नये, अशी मागणीही माजी आमदार नितीन शिंदे यांनी केला. तसेच, राज्य सरकारने राज्यातील गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे 31 मेपर्यंत हटविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने विशाळगडावरील अतिक्रमणे जमीनदोस्त न केल्यास गडावरील दर्याची ‘बाबरी’ करू,’ असा इशारा हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार नितीन शिंदे यांनी यावेळी दिला.

तत्काळ मोहीम सुरू करू

■ न्यायालयाच्या आदेशानुसार तत्काळ विशाळगडावरील मोहीम सुरू करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले. ‘157पैकी 94 बांधकामे जिल्हा प्रशासनाने तोडली आहेत. उर्वरित बांधकामेदेखील न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून तोडली जातील,’ असेही त्यांनी यावेळी सांगितले.