रेल्वेलगतच्या झोपडीधारकांचे तातडीने पुनर्वसन करा! दादर, प्रभादेवी, माटुंगा, माहीममधील झोपडीधारकांची मागणी

प्रातिनिधिक छायाचित्र

दादर, प्रभादेवी, माटुंगा, माहीम पश्चिम रेल्वे स्थानकांच्या जवळ असलेल्या झोपडीधारकांचे पुनर्वसनाचा निर्णय एमयूटीपी 2 ब अंतर्गत 2008 साली रेल्वे आणि राज्य सरकारने घेतला. त्यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 503 झोपडीधारकांपैकी फक्त आठ झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यामुळे शेकडो झोपडीधारक पुनर्वसनापासून वंचित असून या झोपडीधारकांचे तातडीने पुनर्वसन करा, अशी मागणी या झोपडीधारकांनी केली आहे.

मुंबईत दादर, प्रभादेवी, माटुंगा, माहीम या पश्चिम रेल्वे स्थानकांच्या जवळ असलेल्या 503 झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी पश्चिम रेल्वे मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण (एमआरव्हीसी) आणि राज्य सरकार यांच्यात संयुक्त बैठक झाली. या बैठकीत रेल्वे आणि राज्य सरकारने मिळून या झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याचे ठरले. एमआरव्हीसीने स्पार्क या संस्थेला 2016 साली सर्वेक्षणाचे काम दिले, मात्र संस्थेने नीट सर्वेक्षण केले नाही. दादरमधील चेतन हनुमानगर 145 झोपडय़ा, कमलारमणनगर 2 मधील 175 झोपडय़ा, न्यू गणेशनगर माटुंगा रोड 48 झोपडय़ा, न्यू गणेशनगर 40 झोपडय़ा तर प्रभादेवी स्थानकाच्या बाजूला असलेल्या 95 झोपडय़ा अशा एकूण 503 झोपडय़ा आहेत, मात्र यातील केवळ आठ झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले. उर्वरित झोपडीधारक पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारने या विषयाची गंभीर दखल घेऊन या झोपडीधारकांचे तातडीने पुनर्वसन करावे आणि त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी या झोपडीधारकांनी केली आहे.