
गेल्या दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडत आहे. यामध्ये आतापर्यंत अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला, अनेकांना आपली घरे सोडावी लागली. विरोधी पक्ष सातत्याने मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. मात्र भाजप याकडे कानाडोळा करताना दिसत आहे. यातच आता दोन वर्षानंतर मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी मणिपूर हिंसाचाराच्या घटनांबाबत माफी मागितली आहे.
एक पत्रकार परिषद घेत बिरेन सिंह यांनी राज्यात घडलेल्या घटनांबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत जनतेची माफी मागितली. ते म्हणाले, “हे संपूर्ण वर्ष अत्यंत दुर्दैवी गेले. मला खूप खेद वाटतो आणि मी राज्यातील जनतेला सांगू इच्छितो की, 3 मे पासून आतापर्यंत जे काही घडले त्याबद्दल मी माफी मागतो. या घटनांमध्ये अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावले, अनेकांना घरे सोडावी लागली. यासाठी मला याचा खूप खेद वाटत असून यासाठी मला सर्वांची माफी मागायची आहे.”