
ईशान किशनच्या तुफानी शतकाच्या आणि ट्रॅव्हिस हेडच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2025 च्या पहिल्याच सामन्यात 286 धावांचा डोंगर उभा केला. सनरायझर्स हैदराबादचा आक्रमक खेळ यंदाच्या हंगामातही गेल्या वर्षीप्रमाणेच दिसून येत आहे. ईशान किशन हा या हंगामात आपलं पहिलं शतक केलं आहे, तर ट्रॅव्हिस हेडने 31 चेंडूंमध्ये 67 धावा केल्या आहेत.
ईशान किशनने 45 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले आणि 47 चेंडूंमध्ये 106 धावांवर नाबाद राहिला. सनरायझर्स हैदराबादसाठी पदार्पणाच्या सामन्यातच त्याने शतक झळकावले. ईशानच्या फटकेबाजीमध्ये 11 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता.
सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या सर्वच फलंदाजांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला. अभिषेक शर्माने 11 चेंडूंमध्ये 5 चौकारांसह 24 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने 31 चेंडूंमध्ये 67 धावा केल्या, ज्यात 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. नितीश कुमार रेड्डीने 15 चेंडूंमध्ये 30 धावा केल्या. त्यात 4 चौकार आणि एक षटकार होता. हेनरिक क्लासेनने 14 चेंडूंमध्ये 34 धावांची खेळी केली, ज्यात 5 चौकार आणि एक षटकार सामील होता.