कापरी नदीतून शेकडो ब्रास वाळूची अवैध तस्करी; प्रशासनाकडे कारवाईची मागणी

ढवळपुरी (ता. पारनेर) व नांदगाव शिंगवे (ता. नगर) मार्गे के.के. रेंज या लष्करी भागातील कापरी नदीत काही दिवसांपासून दिवसाकाठी शेकडो ब्रास वाळूची अवैध तस्करी सुरू आहे. वाळू तस्करीकडे महसुल विभाग व संबंधित पोलीस प्रशासनाची डोळेझाक सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात वाळू तस्करीला चांगलेच उधाण आले असून, कोणालाही न जुमानता ट्रॅक्टर, डंपरद्वारे भरधाव वेगाने मोठ्या प्रमाणात वाळू वाहतुक सुरु असून, सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे. या पार्श्‍वभूमीवर वाळू तस्करांपासून होणारा त्रास थांबावा म्हणून आदिवासी भिल्ल समाजातील युवकांच्या वतीने राजू लक्ष्मण पवार यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली आहे.

अवैध वाळू वाहतुकीपासून ढवळपुरी (ता. पारनेर) व नांदगाव शिंगवे (ता. नगर) येथील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अवैध वाळू उपसाने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना महसूल विभाग व पोलिस यंत्रणा मात्र गप्प असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचा सुर उमटत आहे. डंपर, ट्रॅक्टरच्या नंबर प्लेटा काढून भरधाव वेगाने वाळूच्या गाड्या वाहतुक करत आहे.

कापरी नदीमध्ये दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून, आठ ते दहा जेसीबी मशीनच्या सहाय्याने वाळू उपसा होत आहे. 80 ते 90 डंपर दररोज हायवे वरून वाळूची वाहतूक करत आहे. गाड्या जाण्या-येण्याचा मार्ग ढवळपुरी, सुतारवाडी, लालूचा तांडा, जांभूळबन महा असून, ही वाहने के.के. रेंज येथील कापरी नदीत वाळू भरण्यास येतात. याच रस्त्यावर सहा ते सात जिल्हा परिषदच्या शाळा असून, तेथील विद्यार्थ्यांमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरपासून धोका निर्माण झाला आहे. या वाहनांमुळे अनेक लहान-मोठे अपघात होत असून, या भागात मेंढपाळ व धनगर समाज देखील मोठ्या प्रमाणात आहे. कोणी वाहनांना हटकल्यास त्यांना धमकाविण्याचे प्रकार सुरु आहे. वाळू तस्करी व ओव्हरलोड वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. ढवळपुरी गावचा शुक्रवारच्या आठवडे बाजारच्या वेळेसही मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतुक सुरु आहे. नांदगाव शिंगवे या मार्गे देखील नगर, देहरे, शिंगवे, नांदगाव, सजलपुर, कोळपे आखाडा या भागातून कापरी नदीतून केलेल्या वाळूची वाहतुक सुरु असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

आदिवासी लोकांच्या मुलांना धमकावून व बळजबरीने पाळत ठेवण्यासाठी कामावर ठेवले जात आहे. रात्रभर त्यांना विविध ठिकाणी नेमले गेले असून, शासकीय वाहने त्या रस्त्यावर आल्यास वाळूचे डंपर शेतकऱ्यांच्या शेतात घुसवतात. त्यामुळे शेतातील पिकांची नासाडी होत आहे. हा प्रकार महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांना माहीत असून, देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वाळू तस्करी जोमात असताना महसूल विभाग आणि पोलिस यंत्रणा कोमात गेल्याने तस्करांना आळा घालणारा तरी कोण? असा प्रश्‍न सर्वसामान्य ग्रामस्थ उपस्थित करत आहे.

शासनाच्या महसुलावर दरोडा टाकणाऱ्या व ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या वाळू तस्करांना जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आवर घालावा, अशी मागणी आदिवासी भिल्ल समाजातील युवकांच्या वतीने करण्यात आली आहे. संपूर्ण माहिती देऊनही कारवाई होत नाही, उलट गोपनीय माहिती देणाऱ्याचे नाव वाळू माफियांना सांगितले जात असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. माहिती दिल्याचा राग मनात धरून वाळू तस्कर गावातील नागरिक व युवकांना त्रास देत आहे. त्यांची दहशत कायमची संपविण्यासाठी सुरु असलेल्या अवैध वाळू उपसावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालवर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तक्रारदार राजू पवार यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सदर वाळू उपसाचे व्हिडिओ चित्रीकरण दाखवले असून, याबाबतचे पुरावे देखील दिले आहे. ग्रामस्थ वाळू तस्करांच्या दहशतीने वैतागले असून, त्यांच्यावर कारवाई करुन वाळू उपसा थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.