अहिल्यानगर शहरातील झेंडीगेट परिसरात व इतरत्र सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांमध्ये सर्रासपणे गोवंशीय जनावरांची कत्तल केली जात आहे. पोलिसांकडून अनेकदा कारवाई करून आणि गुन्हे दाखल करूनही हे प्रकार चोरून लपून सुरूच आहेत. त्यामुळे हिंदू संघटना आक्रमक झालेल्या आहेत. हे कत्तलखाने कायमस्वरूपी बंद झाले नाही, तर शहरात मोठ्या प्रमाणावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर अवैध कत्तलखाने कायमस्वरूपी बंद होण्याबाबत आपल्या स्तरावर कायदेशीर कारवाई करा, असे पत्र शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना दिले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, कोतवाली पोलीस स्टेशन यांचा संदर्भीय अहवाल या कार्यालयास प्राप्त झाला आहे. सदर अहवालाचे अवलोकन करता, भारतामध्ये तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करणे, त्या गोमांसाची विक्री करणे यावर बंदी घालून त्या संदर्भात भारतीय दंड विधान, भारतीय न्याय संहिता 2023, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1996, प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 प्रमाणे वेगवेगळे कायदे असतानाही कोतवाली पोलीस
स्टेशन हद्दीत झेंडीगेट भागामध्ये काही ठराविक इसम हे गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून त्या गोमांसाची विक्री करतात. त्यावर कोतवाली पोलीस स्टेशन, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडून वेळोवेळी कायदेशीर कारवाई करून वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. त्या गुन्ह्यांमध्ये वेगवेगळ्या वर्णाचे गोवंश जातीचे पशू तसेच गोमांस ताब्यात घेऊन त्याची कायदेशीर विल्हेवाट लावली आहे. सदर कारवाईमध्ये ताब्यात घेतलेल्या आरोपींवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांचे चांगल्या वर्तणुकीचे बॉण्ड घेण्यात आले आहे. तरीदेखील गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्या गोमासांची विक्री करण्याचा व्यवसाय चोरून लपून चालू आहे.
वेळोवेळी विविध कलम व कायद्यान्वये गुन्हे दाखल करूनही यातील आरोपींना झेंडीगेट परिसरातील गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून त्या गोमांसाची विक्री करण्याचा आडोसा मिळत असल्याने याबाबत हिंदू संघटना आक्रमक झालेल्या आहेत. सदर ठिकाणचे कत्तलखाने कायमस्वरूपी बंद झाले नाही, तर अहिल्यानगर शहरात मोठ्या प्रमाणावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. चालू असलेल्या अवैध गोवंशीय जनावरांच्या कत्तलखान्यावर आपल्या स्तरावर कायदेशीर उपयायोजना करण्यात याव्यात. सदरचे कत्तलखाने कायमस्वरूपी बंद होण्यास कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे पत्रात म्हटले आहे.
येथे आहेत अवैध कत्तलखाने
कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील कारी मशीदसमोर, व्यापारी मोहल्ला अॅडोगट, 22 नंबर मशीद शेजारी झेंडीगेट, बागवान गल्ली एवन बिर्याणी हाउस पाठीमागे झेंडीगेट, सरकारी शौचालयाच्या समोर व्यापारी मोहल्ला. झेंडीगेट, कुरेशी मशीद जवळ, झेंडीगेट.