नवी मुंबई विमानतळाजवळील बेकायदा कत्तलखाने बंद होणार, पर्यावरण व्यवस्थापन समितीची स्थापना

navi-mumbai-airport

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला आणि दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. या विमानतळावर हवाई दलाच्या आणि खासगी प्रवासी विमान कंपनीच्या विमानाचे लँडिंगही यशस्वीरीत्या झाले असून आता मार्च महिन्यापासून विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू होईल. पण विमानउड्डाणाच्या काळात विमानांना पक्ष्यांची धडक बसून अपघाताचा धोका असतो. त्यामुळे हे धोके कमी करण्यासाठी वीस तज्ञांची एरोड्रोम पर्यावरण व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्याच्य नगरविकास विभागाने घेतला आहे.

मुंबईसह देशाच्या अनेक विमानतळांच्या परिसरात अनधिकृत वसाहती, कत्तलखाने आहेत. झोपडय़ांमधून फेकण्यात येणारे खाद्यपदार्थ आणि कत्तलखान्यांमधून बाहेर फेकण्यात येणाऱया टाकाऊ पदार्थांवर पक्षी आकर्षित होतात. केवळ पक्षी नाही, तर वन्यजीवही विमानतळाच्या धावपट्टीवर थेट येतात. विमानतळावरच्या धावपट्टीवर कुत्रे आल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. मुख्य म्हणजे कत्तलखाने किंवा झोपडपट्टीमधून बाहेर फेकण्यात आलेल्या टाकाऊ खाद्यावर ताव मारण्यासाठी पक्षी येतात. या पक्ष्यांची धडक विमानतळावरून उड्डाण करणाऱया किंवा उतरणाऱया विमानांना धडक बसते. त्यातून विमानाला अपघात होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे विमानांच्या अपघातांचा धोका कमी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य सरकारने एरोड्रोम पर्यावरण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक हे या समितीचे अध्यक्ष असतील. त्याशिवाय कोकण विभागीय आयुक्त, नवी मुंबईचे पोलिस आयुक्त, नवी मुंबई आणि पनवेल महापालिकेचे आयुक्त तसेच केंद्रीय औद्योगिक दलाचे सचिव, विमान कंपन्यांचे प्रतिनिधी, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा वीस जणांचा या समितीमध्ये समावेश आहे.

पर्यावरण नियम काय सांगतो…

विमान अधिनियम 1937च्या उपनियम 91 आणि विमान अधिनियम 1934 नुसार विमानतळाच्या 10 किमीच्या त्रिज्येत प्राण्यांची कत्तल करणे, त्यांची कातडी किंवा अवशेष फेकणे, कचरा आणि इतर प्रदूषित किंवा घातक पदार्थ टाकण्यास बंदी आहे. नवी मुंबई विमानतळाच्या आसपास दहा ते पंधरा किमी क्षेत्रात पर्यावरण स्वच्छता ठेवण्याच्या दृष्टिकोनातूच्या उपाययोजनांवर ही समिती निर्णय घेईल.