#Bangladesh: अरुणाचलला अवैध स्थलांतरितांचा धोका? अनेकजण सीमाभागातून शिरण्याच्या तयारीत, विद्यार्थी संघटनेने केली सीमेवर कडक नजर ठेवण्याची मागणी

 

अरुणाचल प्रदेशातील विद्यार्थ्यांच्या संघटनेने हिंसाचारग्रस्त बांगलादेशातील अवैध स्थलांतरितांचा मुद्दा उपस्थित करत भिती व्यक्त केली आहे. बांगलादेशातील अवैध स्थलांतरित अरुणाचलच्या सीमाभागातून प्रवेश करण्याची शक्यता आहे. ते रोखण्यासाठी सीमेवर कडक पाहारा ठेवत दक्षता वाढवण्याची सरकारला विनंती केली आहे.

राज्याचे गृहमंत्री मामा नाटुंग यांना दिलेल्या निवेदनात, ऑल अरुणाचल प्रदेश स्टुडंट्स युनियन (AAPSU) ने म्हटलं आहे की अनेक रिपोर्टमध्ये अशी शक्यता वर्तवली आहे की शेजारील देशातील बरेच लोक विस्थापित झाले आहेत आणि त्यांनी बेकायदेशीरपणे हिंदुस्थानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे.

‘बांगलादेशातील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर, आम्हाला मोठ्या संख्येने लोक विस्थापित झाल्याच्या आणि अवैधरित्या हिंदुस्थानात प्रवेश करण्याचा प्रयत्नात असल्याच्या बातम्या मिळाल्या आहेत’, असं त्यात म्हटलं आहे.

राज्याच्या विद्यार्थी संघटनेनं सांगितलं की ते ‘अरुणाचल प्रदेशात अवैध स्थलांतरितांच्या संभाव्य प्रवेशाबद्दल खूप चिंतीत आहेत, ज्यामुळे मूळच्या आदिवासींना धोका निर्माण होऊन राज्याचा लोकसंख्याशास्त्रीय समतोल बिघडू शकतो’, असे AAPSU ने मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

‘कोणतेही बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी आम्ही सरकारला गंभीर्यानं आणि तत्काळ उपाययोजना करण्याचं आवाहन करतो’, असंही त्यात म्हटलं आहे.

आदिवासी समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि राज्याची सामाजिक-सांस्कृतिक अखंडता राखण्यासाठी या उपाययोजना महत्त्वपूर्ण आहेत, असा विद्यार्थ्यांच्या संघटनेचा ठाम विश्वास आहे.

बांगलादेशात मंगळवारी झालेल्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये मृतांची संख्या 440 वर पोहोचली आहे, स्थानिक मीडियानुसार, हिंसाचारग्रस्त देशात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराकडून प्रयत्न सुरू आहे.

नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांची बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी नियुक्ती केली होती, ज्याच्या एका दिवसानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि नोकऱ्यांमधील विवादास्पद कोटा प्रणालीवर त्यांच्या सरकारच्या विरोधात निषेधानंतर देश सोडून पळ काढला.

नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार गुरूवारी शपथ घेणार आहे.