लकी कंपाऊंड, साईराजसह अन्य इमारत दुर्घटनांमध्ये अनेक निष्पाप रहिवाशांचा बळी गेला. बेकायदा बांधकामांमुळेच या दुर्घटना घडल्या असताना मिंधे सरकारने मात्र जबाबदार असलेल्या पालिकेच्या 11 सहाय्यक आयुक्तांना क्लीन चिट दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या घटनांना अधिकारी जबाबदार नसतील तर कोण आहेत, असा सवाल नागरिकांनी केला असून दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालून सत्ताधारी नेमके कोणाला वाचवत आहेत, असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे.
मुंब्रा परिसरातील लकी कंपाऊंड वागळे येथील साईराज इमारत तसेच इतर भागातील इमारती कोसळून अनेक जणांचे मृत्यू झाले आहेत. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अशा बेकायदा बांधकामांना कायमचा पायबंद घालण्यासाठी लोकप्रतिनिधींनी महासभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर चर्चा झाल्यानंतर सभागृहाने बांधकामांच्या चौकशीचा ठराव मंजूर करीत सर्व सहाय्यक आयुक्तांची शासनाने चौकशी केली. यामध्ये बारापैकी अकरा सहाय्यक आयुक्तांना चौकशी अधिकाऱ्याने दोषारोपातून मुक्त केले आहे आणि एका सहाय्यक आयुक्ताची चौकशी प्रलंबित आहे.
चौकशीचा अहवाल स्वीकारू नका?
चौकशीचा अहवाल पालिका आयुक्तांनी स्वीकारू नये अशी मागणी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. बेकायदा बांधकामाबाबत जर सहाय्यक आयुक्त दोषी नसतील तर मग दोषी कोण, असा सवाल त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. तसेच आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर पुन्हा चौकशी करावी. तसेच यासंदर्भात न्यायालयात जाण्याबरोबरच एसआयटी चौकशी करण्याची मागणीदेखील चव्हाण यांनी केली आहे.