उलव्यात पेट्रोल, गॅसच्या बेकायदा धंद्यांनी घेतला चार जणांचा बळी

पेट्रोल, गॅसच्या अवैध धंद्यांनी उलव्यातील एकाच कुटुंबातील चार जणांचा बळी घेतला आहे. बुधवारी रात्री झालेल्या सिलिंडरच्या भीषण स्फोटात एका महिलेसह दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेले रमेश भाटी यांचा आज रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे या घटनेतील मृतांचा आकडा चारवर गेला आहे.

उलवे नोडमधील जावळे गावात रमेश भाटी हे राजस्थानी गृहस्थ आपली पत्नी मंजू, मुलगी लक्ष्मी (15), मुलगा चेतन (12) यांच्यासह भाड्याने घर घेऊन राहत होते. राहत्या घरातच त्यांनी किरणा मालाचे दुकान थाटले होते. बुधवारी रात्री अचानक दुकानात आग लागली. यामुळे घरात विक्रीसाठी ठेवण्यात आलेले छोटे-मोठे गॅस सिलिंडर व पेट्रोलचे कॅन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि एकामागोमाग एक भीषण स्फोट झाले. या भयंकर घटनेत रमेश भाटी यांची पत्नी मंजू, मुलगी लक्ष्मी, मुलगा चेतन यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीररीत्या जखमी झालेले रमेश भाटी यांचा उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला आहे. घराशेजारी असलेले आणखी एक इसम दिलशान अली हेही या घटनेत गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती उलवे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राजाने यांनी दिली.