बेकायदा बॅनर लावणाऱ्यांऐवजी डिझाईन करणाऱ्यांनाच ठोठावला दंड, नवी मुंबई महापालिकेची अजब कारवाई

गणेशोत्सवात भाजप आणि मिंधे गटाच्या वतीने झळकवण्यात आलेल्या बेकायदा बॅनरमुळे संपूर्ण शहर विद्रुप झाले आहे. मात्र या विद्रुपीकरणाला जे जबाबदार आहेत त्यांना अभय देऊन पालिका प्रशासनाने बॅनरचे डिझाईन बनवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. डिझाईन बनवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पालिकेच्या या अजब कारवाईमुळे नवी मुंबईकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

गणेशोत्सवानिमित्त गणेशभक्तांचे स्वागत करण्यासाठी दिघ्यापासून बेलापूरपर्यंत भाजप आणि मिंधे गटाने मोठमोठे बॅनर झळकावले आहेत. या बॅनर्सपैकी सुमारे 95 टक्के बॅनर हे अनधिकृत आहेत. ते लावण्यासाठी पालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. याविरोधात नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र बॅनरमधील फोटो असलेल्या नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना या कारवाईमधून वगळण्यात आले आहे. ज्यांचा या बॅनरशी कोणताही संबंध नाही अशा घटकांना लक्ष्य करण्यात आले आहे. बॅनरचे डिझाईन बनवणाऱ्यांना नोटिसा पाठवून त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे.

चोर सोडून संन्याशाला फाशी

बॅनरमध्ये जे फोटो आहेत त्यांना या विद्रुपीकरणाला जबाबदार धरले पाहिजे. मात्र पालिका प्रशासनाने चोर सोडून आता संन्याशांना फाशी द्यायला सुरुवात केली आहे. बॅनर लावणाऱ्यांऐवजी डिझाईन बनवणाऱ्यांवर होत असलेली कारवाई ही हास्यास्पद आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी व्यक्त केली आहे.