महाराष्ट्रात बेकायदेशीर शस्त्रविक्री उधळली; तिघांना अटक; 8 पिस्तूल आणि 138 काडतुसे जप्त

मुंबई गुन्हे शाखेच्या युनीट-9 ने मुंबई राज्यातील अन्य जिह्यात बेकायदेशीरपणे आधुनिक शस्त्र विकणाऱया एका मोठय़ा डिलरच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याबरोबर अन्य दोघांनाही बेडय़ा ठोकून तब्बल 8 पिस्तुल आणि 138 जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या आरोपींकडून आणखी शस्त्र मिळण्याची दाट शक्यता असून त्यासाठी दया नायक व त्यांचे पथक प्रयत्न करीत आहेत.

जुहू येथे एक व्यक्ती शस्त्र घेऊन येणार असल्याची खबर वरिष्ठ पोलिस निरीक्षक दया नायक यांना मिळाली. त्यानुसार नायक यांच्या सुचनेनुसार त्यांच्या पथकाने जुहूच्या पीव्हीआरच्या पुढे असलेल्या आयएमए मॉल परिसरात सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार ती व्यक्ती त्याठिकाणी येताच पथकाने त्याच्यावर झडप घातली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक पिस्तुल आणि सात जिवंत काडतुसे मिळून आली. त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने ऐरोली येथे एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरात आणखी शस्त्र ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार मीताईलाल गुलाब चौधरी (53) याला अटक करून त्याने सांगितल्याप्रमाणे ऐरोली येथून आणखी पाच पिस्तुल आणि 121 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. दया नायक व पथक इतकेच करून थांबले नाही.

– चौधरी याने चौकशीत दावर चंद्रप्पा देवरमनी उर्फ धावल या साथीदाराचे नाव सांगितले. त्यानुसार पथकाने ऐरोली येथे राहणाऱया धावलला देखील उचलले. धावलच्या ओळखीच्या ठिकाणी चौधरीने पाच पिस्तुल आणि 121 काडतुसे लपवून ठेवली होती. दरम्यान दोघांच्या चौकशीत घनसोली येथे राहणाऱया व सुरक्षा एजन्सी चालविणाऱया पुष्पक मढवी (34) याचे नाव समोर आले. चौधरी व धावलने दोन पिस्तूल आणि काडतुसे मढवीला विकल्याचे सांगितले. त्यानुसार आज मढवीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. अशाप्रकारे तिघांकडून अत्यंत आधुनिक 8 पिस्तुल आणि 138 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.

10 वर्षांपासून बेकायदीशीर विक्री…
मुळचा युपीचा असलेला मिताईलाल चौधरी हा गेल्या दहा वर्षांपासून बेकायदेशीरपणे शस्त्र विकण्याचे काम करतोय. आतापर्यंत त्याने मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी बेकायदेशीर शस्त्र विकल्याचे समोर आले आहे. त्यानुसार दया नायक व त्यांचे पथक आरोपींनी विकलेली शस्त्र हस्तगत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता 8 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मिताईलाल पकडला गेल्याने भविष्यात होणाऱया गुन्ह्यांना आळा घालता आला.