माझी छाती फाडली तर त्यात शरद पवार दिसतील असे विधान अजित पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी केले आहे. तसेच शरद पवार यांची मी भेट घेणार आणि त्यांच्यापुढे लोटांगण घालणार असेही झिरवळ म्हणाले.
टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना नरहरी झिरवळ म्हणाले की, पांडूरंगांच्या शेजारी आम्ही शरद पवार साहेबांना पाहतो. पवार साहेब हे गरीबांचे देव आहेत. हनुमानाची जेव्हा छाती फाडली तर त्यात भगवान राम दिसले होते. तसेच जर माझी छाती फाडली तर शरद पवार साहेब दिसतील. शरद पवार यांना सोडून जेव्हा मी अजित पवार यांच्यासोबत गेलो त्यानंतर शरद पवारांनी मी एकदाही भेटलो नाही. मी कोणत्या तोंडाने साहेबांकडे जाऊ? प्रभू रामचंद्राच्या प्रमाणे माझ्यासाठी आहेत शरद पवार. त्याच प्रभुरामचंद्राचं नाव घेऊन शरद पवार याना फसवलं. हा निर्णय घ्यायला मला भाग पाडलं. त्यानंतरही साहेबांना का भेटायला गेलो नाही याचे मुल्यांकन मीच करू शकतो असे झिरवळ म्हणाले. तसेच मी शरद पवार यांच्याकडे जाणार आणि लोटांगण घालून पाया पडणार. आमच्या सारखे अनेक आहेत त्यांना अडचण झाली आहे म्हणून एकत्र या असे पवारांना सांगणार असेही झिरवळ म्हणाले.