महाकुंभमध्ये आयआयटीयन साधूबाबाची चर्चा; मुंबईत शिक्षण, फोटोग्राफीत करीअर

उत्तर  प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळय़ामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साधू आणि साध्वींची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातील लोक या ठिकाणी पोहोचले आहेत. महाकुंभात आलेले साधू, संत आणि नागा साधू यांचे राहणीमान, त्यांचे आयुष्य आणि त्यांच्या भूतकाळाची चर्चा होत आहे. आयआयटीयन बाबा अशी ओळख असलेल्या साधूचीसुद्धा चर्चा होत आहे. आयआयटीयन बाबाची मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बाबाचे खरे नाव अभय सिंह असे आहे. त्यांनी मुंबई आयआयटीतून एअरोस्पेस इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. फोटोग्राफीत करीअरसुद्धा चांगले सुरू होते.

इंजिनीअरिंग ते संन्यास

अभय सिंह असे नाव असलेले बाबा हे मूळचे हरयाणाचे आहेत. त्यांचा जन्म हरयाणाचा आहे, परंतु ते देशातील वेगवेगळ्या शहरात राहिले. आयआयटी मुंबईत 4 वर्षे शिक्षण घेतल्यानंतर त्यांना फोटोग्राफीची आवड निर्माण झाली. एका वर्षापर्यंत फिजिक्स या विषयात विद्यार्थ्यांना शिकवले. आर्टस्मध्ये मास्टर्स केल्यानंतर फोटोग्राफी सुरू केली. हे सर्व केल्यानंतर मनाला शांती न मिळाल्याने त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. ज्ञानाच्या मागे कुठपर्यंत जाणार, शेवटी इथंच यावं लागणार, असेही ते म्हणाले.

अभय सिंह यांनी अचानक अध्यात्म मार्ग निवडला आणि साधू झाले. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने त्यांची मुलाखत घेतली. त्या वेळी बाबाची भाषा ऐकून पत्रकाराला संशय आला. तुम्ही एवढय़ा चांगल्या प्रकारे बोलता, तुमचे शिक्षण किती झाले? असा प्रश्न विचारल्यावर या बाबाने आयआयटी मुंबईतून शिक्षण झाल्याचे सांगितले.