महाकुंभमध्ये आयआयटी बाबा म्हणून प्रसिद्ध झालेले हरयाणातील झज्जरचे रहिवासी अभय सिंह सध्या सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत. आयआयटीयन बाबाचे काही व्हिडीओ व्हायरल झाले असून यात ते थेट मी देव असल्याचा दावा करत आहे. मी देव आहे आणि सगळे माझ्या हातातील बाहुले आहेत. महादेव माझ्याशी बोलतात. ते मला विष्णू म्हणतात, असा दावाही आयआयटीयन बाबाने व्हिडीओतून केलेला दिसत आहे. या वादग्रस्त विधानावरून नेटिजन्सने बाबाला चांगलेच ट्रोल केले आहे. एका युजरने लिहिले की, बिग बॉसच्या पुढील सीझनसाठी आयआयटी बाबा योग्य आहे. बाबाच्या अमली पदार्थांच्या व्यसनावरही काही युजर्सनी प्रश्न उपस्थित केले. मी सर्वकाही सिद्ध करतो. मी सर्व शक्ती घेईन. मग तुम्ही मान्य कराल. मग विश्वास ठेवायला काय हरकत आहे? मग मी सर्वांना सुदर्शन चक्राने मारीन. जर सुदर्शनाने कापले नाही, तर मी त्रिशुलाने कापीन. महादेवही मला त्रिशूल देतील. मी म्हणतो, मी देव आहे.
तो सुशिक्षित वेडा
आयआयटीयन बाबा हा एक सुशिक्षित वेडा आहे. तो काहीही बरळत आहे. त्यामुळेच त्याच्यावर महाकुंभातील जुना आखाडा शिबिरातून बंदी घालण्यात आली होती. अभय सिंह यांचे कृत्य गुरू-शिष्य परंपरा आणि संन्यासाच्या विरोधात आहे. त्यांनी गुरूला शिवीगाळ केली आहे, असे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते महंत नारायण गिरी यांनी म्हटले आहे. अभय सिंह याने सोशल मीडियावर आपले गुरू महंत सोमेश्वर पुरी यांच्याविरोधात अपशब्द वापरले. त्यामुळे त्याला आखाडा पॅन्टोन्मेंट आणि परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. आखाडय़ात शिस्त सर्वात महत्त्वाची आहे. आखाडय़ातील प्रत्येक सदस्याने शिस्तबद्ध राहावे, मात्र अभय सिंह यांनी आपल्या गुरूचा अपमान करून ही परंपरा मोडीत काढली. हे पाहता आखाडय़ाच्या शिस्त पालन समितीने त्यांच्यावर कारवाईची शिफारस केली आणि त्यांची हकालपट्टी केली, तर दुसरीकडे आखाडय़ाच्या सदस्यांनी त्यांना तेथे राहण्यास नकार दिल्याने मी आखाडा सोडला, असे आयआयटीयन बाबाने म्हटले.