गोखले ब्रीज सुरू झाल्यामुळे अंधेरी, सांताक्रुझची वाहूतककोंडी फुटणार, ‘आयआयटी’, ‘व्हीजेटीआय’चा हिरवा कंदील

अंधेरी पूर्व व पश्चिम प्रवासासाठी महत्त्वपूर्ण असणाऱया बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग अंशत: उचलून गोखले उड्डाणपुलाच्या समांतर उंचीवर जोडण्याचे काम पूर्ण झाले असून गुरुवारपासून अंधेरी पश्चिम ते पूर्व असा प्रवास सुरू होणार आहे. वाहतुकीसाठी हरकत नसल्याबाबतचा अहवाल ‘आयआयटी’, ‘व्हीजेटीआय’ संस्थांनी दिल्यामुळे गुरुवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून या पुलाच्या एका बाजूने पूर्ण क्षमतेने वाहतूक होईल.

गोखले ब्रीज बांधून झाल्यानंतर बर्फीवाला पुलाला जोडण्यात उंचीतील फरकामुळे गोंधळ निर्माण झाला होता. मात्र हायड्रॉलिक जॅक आणि ‘एमएस स्टूल पॅकिंग’चा वापर करून दोन्ही पूल जोडण्याचे आव्हानात्मक काम पालिकेने विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे. या पुलावर जुहूपासून अंधेरी असा पश्चिम-पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका जोडण्यासंदर्भातील सर्व संरचनात्मक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यानुसार, ‘नॉन डिस्ट्रक्टीव्ह’ आणि ‘क्यू’ या दोन महत्त्वपूर्ण चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तसेच ‘लोड टेस्ट’देखील घेण्यात आली आहे. शिवाय वाहतुकीसंबंधित तांत्रिक कामे दोन दिवसांत पूर्ण होणार असून 4 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपासून जुहू दिशेने अंधेरी असा पश्चिम-पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरू होईल.

अवजड वाहनांसाठी बंदी

गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम सध्या रेल्वे भागातील हद्दीत सुरू आहे. त्यामुळे बर्फीवाला आणि गोखले पुलावर फक्त हलक्या वाहनांना प्रवेशासाठी मुभा देण्यात आली आहे. तर अवजड वाहनांसाठी उंचीरोधक (हाईट बॅरिअर) बसविण्यात आलेले आहेत. दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे.

असे झाले काम…

– ‘काँक्रीट क्युरेटिंरग’च्या कामासाठी आवश्यक 14 दिवसांचा अवधी देण्यात आला होता. या क्यूरिंगसाठी उच्च दर्जाच्या काँक्रीट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. क्यूरिंगसोबतच समांतर अशा पद्धतीने जोडणी सांध्याचे कामदेखील पूर्ण करण्यात आले आहे.

– त्यानंतर पुलावर विशिष्ट तासांच्या कालावधीत ‘लोड टेस्ट’ करण्यात आली. पुलांवर वाहतूक सुरू होण्याच्या दृष्टीने आवश्यक ते काम यापूर्वी निर्धारित करण्यात आलेल्या टप्प्यांनुसार पूर्ण करण्यात आले आहे.

– सी. डी. बर्फीवाला पुलाची पातळी उचलण्याची कार्यपद्धती व सर्वसाधारण आराखडा ‘व्हीजेटीआय’ आणि ‘आयआयटी’ने आरेखित केला आहे. तर, पूल जोडणी कार्यपद्धती व्हीजेटीआयद्वारे बनवण्यात आली आहे. आयआयटी मुंबईने या कार्यपद्धतीची पडताळणी करून त्यात काही सुधारणा सुचवल्या. सदर सुधारित कार्यपद्धतीची अंमलबजावणी व्हीजेटीआयच्या निरीक्षणाखाली करण्यात आली आहे.