JEE (Advanced) अटेंप्टच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, पण ड्रॉपआउट्ससाठीही दिलासा

जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (अ‍ॅडव्हान्स्ड) म्हणजेच JEE (Advanced) च्या अटेंप्ट संख्या तीनवरून दोन करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेनुसार हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मात्र त्याचवेळी याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी दिलासा मिळाला आहे. कारण 5 नोव्हेंबर 2024 ते 18 नोव्हेंबर 2024 दरम्यान अभ्यासक्रम सोडलेल्या याचिकाकर्त्यांना परीक्षा देण्याची परवानगी दिली जाईल, असा निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.

तर त्याचवेळी JEE (Advanced) च्या प्रयत्नांची संख्या कमी करण्याच्या अधिकाऱ्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला.

याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ वकील के. परमेश्वर यांनी युक्तिवाद केला की, ‘सुरुवातीला तीन अटेंप्टची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु तेरा दिवसांच्या आत तो रद्द करण्यात आला, जो अनियंत्रित आहे. 5 नोव्हेंबर रोजी, तुम्ही विद्यार्थ्यांना पात्र ठरतील असे आश्वासन दिले. त्या आधारे निर्णय घेण्यात आले आहेत, जे बदलता येणार नाहीत’.

जॉइंट अ‍ॅडमिशन बोर्ड (जेएबी) कडून उपस्थित असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या निर्णयाचे समर्थन केले.

‘नियमित अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी त्यांच्या बी.टेक अभ्यासक्रमांऐवजी JEE परीक्षेवर लक्ष केंद्रित करत असल्याचे आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेण्यात आला आहे आणि हा एक पूर्णपणे धोरणात्मक निर्णय आहे’, असं त्यांनी खंडपीठाला सांगितलं.

युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायमूर्ती बीआर गवई आणि ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने नमूद केलं, ‘5 नोव्हेंबर 2024 रोजीच्या प्रेस रिलीजमध्ये, विद्यार्थ्यांना स्पष्ट आश्वासन देण्यात आले होते की 2023, 2024 आणि 2025 मध्ये बारावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी JEE (Advanced) साठी पात्र असतील. जर विद्यार्थ्यांनी या निवेदनावर विश्वास ठेवून त्यांना बसण्यास पात्र असल्याचे समजून त्यांच्या अभ्यासक्रम सोडले तर, तर 18 नोव्हेंबर 2024 रोजीचे हे वचन मागे घेणे त्यांच्या नुकसानीचे ठरू शकत नाही’.

‘विचित्र तथ्ये आणि परिस्थितीत, जेएबीच्या निर्णयाच्या गुणवत्तेवर भाष्य न करता, 5 नोव्हेंबर 2024 ते 18 नोव्हेंबर 2024 दरम्यान अभ्यासक्रम सोडून गेलेल्या आणि कॉलेज सोडलेल्या विद्यार्थ्यांना जेईई (अ‍ॅडव्हान्स्ड) साठी नोंदणी करण्याची परवानगी दिली जाईल.’