पूजा खेडकर नंतर आता ज्योतीचा पर्दाफाश; UPSC फेल होऊनही पोलीस अधिकाऱ्याची मुलगी झाली IFS!

पुणे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरची जोरदार चर्चा आहे. बनावट कागदपत्र आणि खोटी माहिती देऊन आयएएसची पदवी मिळवणं पूजा खेडकरच्या अंगलट आलं आहे. दरम्यान, रिव्हॉल्व्हर रोखून शेतकऱ्याला दमदाटी केल्याप्रकरणी गुरूवारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे प्रकपण ताजे असताना असेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. एका यूपीएससीची परीक्षा पास न होताच आयएफएस म्हणून एक तरुणी वावरत आहे.

दरम्यान टाईम्स ऑफ इंडियाने यासंबंधी वृत्त दिले आहे. ज्योती मिश्रा असे या तरुणीचे नाव असून ती रायबरेलीची रहिवासी आहे. ज्योतीने 2021 मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली होती. तिच्यासोबत तिच्या मैत्रिणीनेही परीक्षा दिली. या परीक्षेत ज्योती नापास झाली. मात्र तिची मैत्रिण या परीक्षेत पास झाल्यामुळे तिला हे अपयश सहन झाले नाही. त्यामुळे तिने यूपीएससीच्या परीक्षेला बसणऱ्या दुसऱ्या ज्योतीच्या नावाचा वापर केला. हे नाव आपलेच असल्याचे सांगत आपण IFS अधिकारी म्हणून स्पेनमध्ये रुजू झाल्याचे ज्योतीने सगळ्यांना सांगितले. ज्योती ही उत्तर प्रदेशाच्या रायबरेलीतील पोलीस उपनिरिक्षकाची मुलगी आहे.

असं आलं सत्य समोर

दरम्यान, पूजा खेडकर प्रकरण समोर आल्यापासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यावेळी ट्विटरवरील एका यूजरने सोशल मीडियावर सत्कार सोहळ्याच्या पोस्ट पाहून 2021 च्या यूपीएससी निकालाचा शोध घेतला. यावेळी IFS म्हणून वावरत असलेली ज्योती ही बनावट अधिकारी असल्याचे त्याच्या लक्षात आले. याच आधारावर त्याने ही माहिती सोशल मीडियावर टाकून ज्योतीचे बिंग फोडले. मात्र ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आपली बदनामी केली जात असल्याचा आरोप ज्योतीने केला आहे.

पूजा खेडकर नंतर आता ज्योती अशी नवनवीन प्रकरणं समोर येऊ लागल्यामुळे आणखी काही सोशल मीडिया यूजरने स्पेनमधील हिंदुस्थानींशी संपर्क साधून ज्योती नावाच्या अधिकाऱ्याबाबत चौकशी सुरू केली. या तपासादरम्यान एका व्यक्तीने आमच्याकडे ज्योती नावाची कोणतीही अधिकारी नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे हे प्रकरण उघड झाले.