कानडी आमदाराला चोप देऊ; शिवसेनेचा इशारा; कोल्हापूरच्या बिंदू चौकात संतप्त निदर्शने

बेळगावसह सीमाभागाचा मुंबईवर हक्क आहे. मुंबई केंद्रशासित प्रदेश करा, असे वक्तव्य करून जाणीवपूर्वक मराठी भाषिकांना डिवचणाऱया कर्नाटकातील काँग्रेस आमदाराविरोधात आज राज्यभर संताप व्यक्त होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवसैनिकांनी ऐतिहासिक बिंदू चौकात निषेध करीत, ‘या आमदाराने कर्नाटकची सीमा ओलांडून महाराष्ट्रात यावे, त्याला कपडे फाटेपर्यंत बदडून काढू,’ असा इशारा शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी दिला.

कर्नाटकातील सरकार मराठी भाषिकांवर अन्याय करत आहे. पण राज्य सरकारने या जनतेला आरोग्याच्या सोयीसुविधांसह ‘लाडकी बहीण’ योजनेचे 2100 रुपये द्यावेत, अशी मागणीही शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यावेळी शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, विराज पाटील, विशाल देवकुळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.