आडवे चाललात तर गुलाल लागत नसतो; नाव न घेता जरांगे यांचा भुजबळांना इशारा

तुम्ही एकत्र आलात तर आम्ही समजून घ्यायचं आणि आम्ही एकत्र आलोत की तुम्ही जळफळाट करायचा. मराठ्यांनी कधीही ओबीसींना आरक्षण देऊ नका असे म्हटलेले नाही. मात्र ओबीसींच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला. आम्ही कधीच जातीयवाद केला नाही. मराठ्यांनी मनावर घेतले तर या राज्यात काहीही होऊ शकते, आडवे चाललात तर गुलाल कधीच लागत नसतो, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता भुजबळांना दिला.

विनायकराव मेटे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील त्यांच्या समाधीस्थळी आयोजित अभिवादन कार्यक्रमाला मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मी जातीयवाद कधीच केला नाही. माझ्या मराठ्यांच्या लेकरांचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून रस्त्यावर उतरलो. आरक्षणासाठी विनायक मेटे यांनी बलिदान दिले. त्यांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. मराठवाड्यामध्ये 1884 पासून आरक्षण दिले जात होते. ओबीसीच्या अगोदर मराठा समाजाला आरक्षण होते, हे ओबीसींचे नेते समजून घ्यायला तयार नाहीत. गावखेड्यात मराठा आणि ओबीसी गुण्यागोविंदाने राहत आहेत. मात्र ओबीसींच्या नेत्यांना हे नको आहे. 57 लाख कुणबी मराठा नोंदी सापडल्या तरीही ओबीसीचे नेते या नोंदी रद्द करा म्हणत आहेत हा जातीयवाद नाही का? आम्ही ओबीसींच्या ताटातलं काहीच घेत नाहीत. आम्ही आमच्या हक्काचं मागत आहोत. आमच्या वेदना त्यांना नाही कळायच्या. मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे आहे, या मतावर आम्ही ठाम आहोत. त्यांनी यासाठी कितीही टोळके गोळा केले तरी आमचा हक्क आम्ही मिळवणार आहोत.

शिवस्मारकाची एक वीटही रचण्यात आली नाही – ज्योती मेटे
विनायकराव मेटे यांनी दाखवलेल्या रस्त्याने आपण जात आहोत. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्यदिव्य शिवस्मारक व्हावे ही त्यांची प्रामाणिक इच्छा होती. त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. या शिवस्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मात्र त्यानंतर एकही वीटही रचली गेली नाही, अशी खंत ज्योती मेटे यांनी यावेळी व्यक्त केली.

मातोरीतील दगडफेक भुजबळांच्या सांगण्यावरून
मराठा आणि ओबीसी यांच्यातील वादाचा कर्ताकरविता नाशिकमध्ये बसला आहे. नाशिकमध्ये बसलेल्या त्या ओबीसी नेत्याला मराठ्यांविषयी नेहमीच मळमळ राहिली आहे. छगन भुजबळ पोलिसांवर दबाव आणत आहेत. कुठंही घटना घडली की त्या घटनेत मराठा तरुणांना गुंतविण्याचे काम सुरू आहे. मराठा आणि ओबीसी मतांच्या राड्यात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मताच्या जोरावर छगन भुजबळ फडणवीसांना दाबण्याचे काम करत आहेत. मातोरीत झालेला दगडफेकीचा प्रकार भुजबळांच्या सांगण्यावरून झाला आहे. त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी स्वत:च्या गाड्या फोडून घेतल्या. जर हाके पहाटे चार वाजता भगवानगडावर जाणार होते तर मग रात्री आठ वाजता डीजे वाजवण्याचं कारण काय? हा प्रश्न आम्हाला पडला आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.