देशातील केंद्र सरकार सर्व नोकऱ्यांचे खासगीकरण करत सुटले आहे. देशभरात नोकरभरतीचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे भविष्यात आपल्या येणाऱ्या पिढीला नोकरी मिळवणे अत्यंत अवघड होणार आहे. आपली मराठी अस्मिता आणि मराठी बाणा टिकवण्यासाठी मुंबईतील मराठी माणसाने आतापासूनच खडबडून जागे होऊन सर्वांनी एकजूट होण्याची गरज असल्याचे आवाहन स्थानीय लोकाधिकार समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केले.
दादर येथील शिवाजी मंदिर नाटय़गृहात स्थानीय लोकाधिकार समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते भारतीय आयुर्विमा महामंडळ स्थानीय लोकाधिकार समितीच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आमदार सुनील शिंदे, आमदार महेश सावंत यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शीव विधानसभाप्रमुख, भारतीय आयुर्विमा महामंडळ स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष गोपाळ शेलार यांनी केले. या कार्यक्रमाला भारतीय आयुर्विमा महामंडळाचे कार्यकारी संचालक सत्पाल भानू, प्रादेशिक व्यवस्थापक सुधांशू घोडगावकर, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर, शरद एक्के, अनंत वाळके, दीपक मोरे, माजी महापौर श्रद्धा जाधव, शरद जाधव, दिनेश बोभाटे, महेश लाड आदी नेते उपस्थित होते. यावेळी खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते अरुण महाडिक, दशरथ पुजारी, बाळकृष्ण कदम, जितेंद्र पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मराठी वाद्यवृंद ‘माझी माय’ हा कार्यक्रमही सादर झाला.
मुंबईत मराठी माणूस आणि मराठी भाषा टिकवा – अरविंद सावंत
मुंबईत मराठी माणूस उभा राहिला पाहिजे, मराठी भाषा टिकावी यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे शिवसेना नेते अरविंद सावंत म्हणाले. सर्व उद्योग गुजरातला पळवून नेले जात आहेत. ते रोखण्यासाठी मराठी माणूस एकत्र आला पाहिजे. कोणतीही संस्था निर्माण करणे सोपे नसते, परंतु 50 वर्षांपूर्वी स्थानीय लोकाधिकार समिती स्थापन करण्यात आली, समितीचे काम आजही तितकेच जोरात सुरू असल्याचे ते म्हणाले.
आपण मराठी माणूस म्हणून एकत्र आले पाहिजे – अनिल देसाई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वात आधी भूमिपुत्रांसाठी लढा सुरू केल्याने मराठी माणूस आज मुंबईत उभा आहे. शिवसेना नसती तर एकाही मराठी माणसाला नोकरी मिळाली नसती. प्रोफेशनल असूनही तरुणांना कायमस्वरूपी नोकरी मिळत नाही. त्यांना सर्रासपणे कंत्राटी पद्धतीने भरले जात आहेत. येणाऱया पिढीसाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे. काही लोकांकडून विषमता पेरली जात आहे. ती रोखण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यायला हवे. जातीचा अभिमान बाळगण्यापेक्षा मराठी माणूस म्हणून आपण सर्वांनी एकत्रित आले पाहिजे, असे शिवसेना सचिव अनिल देसाई म्हणाले.