
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा सत्तेवर येताच निर्णयांचा धडाका लावला आहे. नुकतेच त्यांनी नवीन टॅरिफ धोरण लागू केले. अमेरिकेने कॅनडा, मेक्सिको, चीनवर टॅरिफ लावण्याची घोषणा केली. अमेरिकेच्या या निर्णयानंतर जगभरात खळबळ उडाली असून आता चीननेही अमेरिकेला जोरदार प्रत्युतर दिले आहे.
अमेरिकेने व्यापार निर्बंधांच्या स्वरुपामध्ये युद्ध सुरू केले असेल तर आम्हीही त्याचा सामना करण्यासाठी तयार आहोत. अमेरिकेने व्यापार युद्ध सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर आम्हीही तयार आहोत आणि हे युद्ध शेवटपर्यंत लढू, असे चीनने बुधवारी म्हटले.
अमेरिका आणि चीन यांच्यात टॅरिफ युद्ध; अमेरिकेतील आयात मालावर चीनचे 15 टक्के टॅक्स
डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिलपासून हिंदुस्थान, चीनसह अन्य देशांवर टॅरिफ लादण्याची घोषणा केली होती. त्याला चीनने प्रत्युतर दिले. यामुळे हे व्यापार युद्ध आगामी काळात आणखी भडण्याची चिन्ह आहेत.
आज पुनरुल्लेख
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर टॅरिफ लावण्याचा आज पुनरुल्लेख केला. अमेरिका जेवढा टॅरिफ लावते त्याहून अधिक टॅरिफ इतर देश अमेरिकेच्या उद्पादनांवर लावतात. हिंदुस्थान आमच्यावर 100 टक्क्यांहून अधिक टॅरिफ लावतो. चीनही दुप्पट, दक्षिण कोरिया चौपट टॅरिफ लावतो. तरीही आम्ही त्यांना लष्करी मदत करतो. पण 2 एप्रिलपासून आमचे सरकार जो देश जेवढे टॅरिफ लावेल तेवढेच टॅरिफ आम्हीही लावू, असे ट्रम्प म्हणाले.