विकास होत नसेल तर परिवर्तन हाच पर्याय; मशालीला मत देण्याचे खासदार काळे यांचे आवाहन

पैठण तालुक्यात मूलभूत सुविधांची वानवा आहे. अनेक वर्षांत कोणताही मोठा प्रकल्प एमआयडीसीत आणता आला नाही. कॅबिनेट व पालकमंत्रीपद असतानाही जर विकास करता येत नसेल तर परिवर्तन हाच पर्याय आहे. त्यासाठी व्होटिंग मशीनच्या क्रमांक एक वरील मशाल चिन्हाचे बटण दाबून मतदान करा व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार दत्ता गोर्डे यांना बहुमताने विजयी करा!’ असे आवाहन खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केले. नांदर व विहामांडवा येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख अॅड. किशोर वैद्य म्हणाले की, वीरभद्रा नदीवरील पुलाचे उद्घाटन करण्यासाठी तत्कालीन आमदार हे आले होते. आम्ही विरोधक असलो तरी त्यावेळी त्यांना स्वागत घेण्यासाठी गावात येण्याची विनंती केली. त्यांनी नकार दिला. तेव्हा येथील जागृत देवस्थान रेणुकादेवीचे तरी दर्शन घ्या, असे सांगितले. परंतु, ते नांदर गावच्या वेशीवरून माघारी गेले. या पार्श्वभूमीवर आम्हा ग्रामस्थांचे त्यांना आवाहन आहे की, त्यांनी आता मतांचा जोगवा मागण्यासाठी आमच्या नांदर गावात येऊ नये !’

यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता गोर्डे व डॉ. सुनील शिंदे यांची घणाघाती भाषणे झाली. माजी मंत्री अनिल पटेल, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद तांबे व काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. कांचनकुमार चाटे यांनी मशाल चिन्हाचे बटण दाबून मतदान करण्याचे आवाहन केले.

यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक राखी परदेशी, स्वाती माने, नीता कायस्थ, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रामनाथ चोरमले, पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश दुबाले, संत एकनाथ साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रल्हाद औटे, शिवाजी नागरी बँकेचे चेअरमन रवींद्र शिवाजीराव काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. गुलदाद पठाण, माजी उपनगराध्यक्ष अप्पासाहेब गायकवाड व प्रा. पी. आर. थोटे उपस्थित होते.