भाजपवाले हटेंगे तो दाम घटेंगे! काँग्रेसचा नवा नारा

भाजप सरकारमुळे महागाईचा आगडोंब उसळला असून खाद्यतेलासह किराणा मालाचे भाव वाढले आहेत. लसूण 500 रुपये किलो, तर कांदा 100 रुपये किलो झाला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे मध्यमवर्गीयांचे किचनचे बजेट कोलमडले आहे. या महागाईतून मोदी सरकार प्रत्येक मराठी कुटुंबाच्या खिशातून वर्षाला 90 हजार रुपये लुटत आहे. या लुटीचा हिशोब मोदी सरकारने द्यावा, असा हल्ला आज काँग्रेसने केला. ‘बटेंगे तो पॉकेट कटेंगे, भाजपवाले हटेंगे तो दाम घटेंगे,’ असा नवा नाराच काँग्रेसने दिला.

टिळक भवन येथील पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी भाजप सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपचे गल्लीतील नेतेही जगातील सर्व मुद्दय़ांवर प्रवचन देतात, पण जनतेला भेडसावणाऱया एकाही प्रश्नावर बोलत नाहीत. ही भाजपच्या प्रचाराची दिशा आहे, असा निशाणा खेरा यांनी साधला.

झारखंडमधील प्रचारात मोदी घुसखोरीवर बोलले. पण देशात 11 वर्षांपासून त्यांचे सरकार आहे. मग ही घुसखोरी झालीच कशी, असा सवाल खेरा यांनी केला. ‘कटेंगे बटेंगे’, ‘एक है तो सेफ है’, ‘व्होट जिहाद’ असे नारे भाजप देत आहे. भाजप जनतेला मूर्ख समजत असेल, पण जनतेला भाजपचा डाव चांगलाच माहीत आहे. प्रत्येक कुटुंबाच्या खिशातून 90 हजार लुटून महिलांना 1500 रुपये दिल्याच्या फुशारक्या मारत आहेत, अशी तोफ त्यांनी डागली.