नेतान्याहू आमच्या देशात आले तर त्यांना लगेच अटक करू, ‘या’ लहान देशाचे इस्रायलला आव्हान

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि इतर अनेकांविरुद्ध वॉरंट जारी केले आहे. त्याबाबत आयरिश पंतप्रधान सायमन हॅरिस म्हणाले की, जर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आयर्लंडमध्ये आले तर त्यांना अटक केली जाईल.” एखाद्या युरोपीय देशाने इस्रायलला अशा प्रकारे डोळा दाखवण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर दुसरीकडे हंगेरीच्या पंतप्रधानांनी थेट आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे वॉरंट स्वीकारण्यास नकार दिला.

वॉरंटबद्दल आयरिश पंतप्रधान काय म्हणाले?

आयरिश पंतप्रधान सायमन हॅरिस यांना वृत्त संस्था आरटीईने विचारले की, इस्रायली पंतप्रधान कोणत्याही कारणास्तव आयर्लंडला आले तर त्यांना अटक केली जाईल का? यावर उत्तर देताना आयरिश पंतप्रधान म्हणाले, “हो नक्कीच, आम्ही आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे समर्थन करतो आणि त्यांच्या वॉरंटची आमच्या देशात अंमलबजावणी करतो.”

ते म्हणाले, “आयर्लंडने आंतरराष्ट्रीय न्यायालयाला मान्यता देऊन करारावर स्वाक्षरी केली आहे. अशातच आंतरराष्ट्रीय न्यायालयाला अपेक्षित असलेल्या आरोपींना अटक करणे हे सदस्य देशांचे कर्तव्य आहे.”

तर हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ओबर्न यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरुद्ध जारी केलेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या अटक वॉरंटचा निषेध केला आहे. शुक्रवारी त्यांनी सांगितले की, ते इस्रायलच्या पंतप्रधानांना त्यांच्या देशात आमंत्रित करणार. तसेच त्यांना अटक करण्यात येणार नाही.