धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नाही, तर जनताच त्यांना खेचून बाहेर काढेल; अंजली दमानिया यांचा इशारा

राज्यातील बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याकांडाने देशभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राज्यात ठिकठिकाणी आक्रोश मोर्चे निघत आहेत. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि जनतेने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. याबाबत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी राज्यपालांची भेट घेत या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे. या प्रकरणी आपण आवाज उठवत असल्याने धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला धमक्या येत असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. तसेच धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही, तर लोक त्यांना खेचून बाहेर काढतील,असा इशाराही अंजली दमानिया यांनी दिला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मीक कराडसह आठ आरोपींना अटक झाली आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे दिला आहे. तर बीडचे पोलिस देखील तपास करीत आहेत. वाल्मीक कराड यांना मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात समजले जाते. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी मंत्री पदावरुन दूर करावे, अशी मागणी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी राज्यपालांकडे केली आहे. या प्रकरणात बीड येथे तळ ठोकून असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना धमक्या देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

दमानिया यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मी लेखी स्वरुपात तक्रार दिली नव्हती. आपण केवळ एसपीसोबत फोनवर बोलून सगळे पुरावे पाठवले होते. माझा फोन नंबर सोशल मीडिया वर व्हायरल करून माझे फोटो अश्लील बनवून समाज माध्यमावर टाकण्यात आले आहेत. पोलिसांनी सर्व पुरावे सायबर सेलकडे देण्याचे सांगितले होते. त्यानुसार सगळ्यांच्या नंबर सह सगळे पुरावे घेत रितसर तक्रार दाखल करायला या ठिकाणी आपण आले असल्याचे दमानिया यांनी सांगितले.

देशमुख यांच्या हत्येपाठचं खरं कारण काय हे आपण सांगितले. कोणी विरोधात उभे राहिले तर संतोष देशमुख सारखी तुमची गत होईल, ही दहशत जी निर्माण करत आहेत. ती दहशत मोडून काढायला हवी. धनंजय मुंडे मंत्रालयात म्हणाले की ‘आपण राजीनामा दिला नाही आणि देणार नाही’ अशी जी भूमिका त्यांनी मांडली आहे. अशी भूमिका कुठलाही योग्य नाही. त्यांना जनाची नाही तर त्यांना मनाची तरी लाज हवी, कसली लाज नसल्यामुळे ते मंत्रिपद सोडायला तयार नाहीत. यांनी पदाचा राजीनामा दिला नाही तर लोकच त्यांना खेचून बाहेर काढतील असेही दमानिया असा इशाराही त्यांनी दिला.