झारखंडमध्ये सारंडा जंगलात नक्षलवाद्यांकडून आईडीचा स्फोट, सीआरपीएफचे दोन जवान जखमी

झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील सारंडा येथील जंगलात नक्षलवाद्यांनी सुरक्षादलाला लक्ष्य करत आईडीचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले. एसआय सुनील कुमार आणि सीआरपीएफ 193 बटालियनचे जवान पार्थ प्रतिमा डे अशी जखमी जवानांची नावे आहेत. शनिवारी दुपारी 2.30 ते 2.45 च्या दरम्यान झालेल्या या कारवाईदरम्यान, छोटानागरा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या वनग्राम मारंगपोंगा परिसरातील जंगली डोंगराळ भागात हा स्फोट झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) नक्षलवादी संघटनेचे प्रमुख नेते मिसिर बेसरा, अनमोल आदी त्यांच्या टोळीतील सदस्यांसह सारंडामध्ये विध्वंसक कारवायांसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे चाईबासा पोलीस, कोब्रा, झारखंड जग्वार आणि सीआरपीएफ बटालियनच्या विविध पथकांची संयुक्त पथके तयार करण्यात आली. छोटनागरा आणि झाराईकेला पोलीस ठाण्याच्या सीमावर्ती जंगली डोंगराळ भागात 4 मार्चपासून एक विशेष संयुक्त मोहीम सुरू करण्यात आली आहे.

य मोहिमेदरम्यान हा स्फोट झाला. यात सीआरपीएफ 193 बटालियनचे सुनील कुमार मंडल आणि पार्थ प्रतिमा डे जखमी झाले. पोलीस दलाने तात्काळ कारवाई करत हेलिकॉप्टरद्वारे तात्काळ प्राथमिक उपचारानंतर जखमी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रगत उपचारांसाठी रांची येथे पाठवण्यात आले.