आयसीसीचा संघही हिंदुस्थानी, टी-20 वर्ल्ड कप संघात हिंदुस्थानचे सहा खेळाडू

टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱया हिंदुस्थानी संघाचा कर्णधार रोहित शर्माकडे आयसीसीच्या वर्ल्ड कप संघाचेही नेतृत्व सोपविण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर 11 पैकी 6 खेळाडू फक्त हिंदुस्थानी संघातील निवडल्यामुळे आयसीसीचा संघही हिंदुस्थानीच झाला आहे.

आयसीसीने टी-20 वर्ल्ड कप संपताच स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱया 11 खेळाडूंची निवड केली. या संघाचा कर्णधार जगज्जेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्माकडे सोपविण्यात आले. आपल्या झंझावाती फलंदाजीने अवघ्या जगाचे लक्ष वेधणारा सूर्यकुमार यादवला मधल्या फळीत स्थान देण्यात आले आहे. तसेच स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करणारा हार्दिक पंडय़ा, अक्षर पटेल, वेगवान गोलंदाज म्हणून अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराचीही निवड करण्यात आली आहे. हिंदुस्थानी संघापाठोपाठ या संघात अफगाणिस्तानच्या राशीद खान, रहमानुल्लाह गुरबाज आणि वेगवान गोलंदाज फझलहक फारुकी या तिघांची वर्णी लागली आहे. फारुकीने स्पर्धेत सर्वाधिक 17 विकेट टिपले आहेत, तर त्याची बरोबरी अर्शदीप सिंहने साधली आहे. यजमान वेस्ट इंडीजचा घणाघाती सलामीवीर निकोलस पूरनला तर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस या दोन खेळाडूंना आयसीसीने आपल्या वर्ल्ड कप संघात स्थान दिले आहे.