दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानवर 2-0 फरकाने निर्भेळ यश मिळविले, मात्र पाकिस्तानच्या या पराभवामुळे आयसीसीच्या नव्या कसोटी क्रमवारीत मोठा बदल झाला. टीम इंडियाची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. हिंदुस्थानी संघ 2016 नंतर दुसऱ्यांदा कसोटी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.
हिंदुस्थानी संघ दीर्घकाळापासून आयसीसी कसोटी क्रमवारीत वर्चस्व गाजवत होता, मात्र गेल्या काही सामन्यांतील पराभवांमुळे टीम इंडियाचे रेटिंग घसरले आहे. टीम इंडिया आता 109 रेटिंग गुणांसह कसोटी क्रमवारीत तिसऱया स्थानावर आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडिया दुसऱया स्थानावर होती. ही मालिका जिंकून रोहित शर्माच्या सेनेला ‘नंबर वन’चे सिंहासन काबीज करण्याची संधी होती, मात्र ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 3-1 फरकाने जिंकली. दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला व्हाईट वॉश देत हिंदुस्थानला मागे टाकत दुसरे स्थान काबीज केले.
हिंदुस्थान डब्ल्यूटीसीच्या फायनलमधून आऊट
ऑस्ट्रेलिया दौऱयानंतर टीम इंडियाला केवळ क्रमवारीतच फटका बसला नाही. तर हिंदुस्थानी संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरीच्या शर्यतीतूनही बाद झाला. ही कसोटीतील जगज्जेतेपदाची लढत ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात 11 जूनपासून खेळवली जाणार आहे. टीम इंडियाला पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवता आलेले नाही. हिंदुस्थानने 2021 आणि 2023 मध्ये या स्पर्धेची फायनल खेळली होती, मात्र आधी न्यूझीलंड आणि नंतर ऑस्ट्रेलिया संघाकडून पराभव झाल्याने हिंदुस्थानला दोन्ही वेळी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यावेळी डब्ल्यूटीसीची फायनल गाठू न शकल्याने टीम इंडियाचे कसोटी जगज्जेतेपदाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले.